पिंपरी : पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात राहणारे अनेक नात्यावर राजकीय नेत्यांची हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे गोची झाली आहे. माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, उद्योजक संदीप वाघेरे , नगरसेवक श्याम लांडे यांच्या सारखे पिंपरी विधानसभेत रहिवासी असणाऱ्या मातब्बर नेत्यांची मतदारसंघ राखीव असल्यामुळे निवडणूक लढवण्यास इच्छा असूनही लढवता येत नाही.
2009 साली राखीव पिंपरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघाचे सुरुवातीला नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरू करणारे व वैद्य आमदार असणारे अण्णा बनसोडे यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले एडवोकेट गौतम चाबुस्कवार यांनी बनसोडे यांना पराभूत करून आमदार झाले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत पुन्हा अण्णा बनसोडे आमदार झाले. मागील पाच वर्षात पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत.
आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्यामुळे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीकडून पिंपरी विधानसभेसाठी दावेदार म्हणून पुढे येत आहेत. मात्र यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघात न राहणारे काही नेत्यांनी पिंपरी विधानसभेसाठी दावेदारी सांगण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक हौसे नवसे निवडणुकीच्या रिंगणात आपणच उतरणार असे ब्रॅण्डग करताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा संपूर्ण याच मतदारसंघातून प्रवास करत असल्याने सर्वाधिक पिंपरी मधील इच्छुकांनी रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांच्या स्वागतासाठी फ्लेक्स बाजी केली आहे.
चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा, तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा 12 किलोमीटरमध्ये दुतर्फा पसरलेला असा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ. मुस्लीम-दलित बहुल, झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचाही प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उमेदवारीचा गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडी व महायुती यांच्यासमोर असेल.
पिंपरी विधानसभेसाठी इच्छुकांची यादी
- आमदार अण्णा बनसोडे
- माजी आमदार गौतम चाबुस्कवार
- सीमा सावळे
- अमित गोरखे
- चंद्रकांता सोनकांबळे
- शेखर ओव्हाळ
- सचिन भोसले
- बाळासाहेब ओव्हाळ
- शैलेश मोरे
- विनायक गायकवाड
- तेजस्विनी कदम




