आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची मुख्य भूमिका असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ने झोकात 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. कमी बजेटमध्ये निर्मिती, कोणताही मोठा चेहरा नसताना मुंज्याने चौथ्या आठवड्यातच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.
बॉक्स ऑफिसवर कल्की 2898 एडी चित्रपटाची लाट आलेली असतानादेखील मुंज्याने एका बाजूने आपली कमाई सुरू ठेवली आहे. ‘कल्की 2898 एडी’मुळे मुंज्याच्या कोटींच्या कमाईला ब्रेक लागल्याचे चित्र होते. मुंज्याने 20 व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर 90 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता ‘मुंज्या’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली.
‘मुंज्या’ने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. यानंतर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 35.3 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवड्यात ‘मुंज्या’ने 32.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता चित्रपटाच्या रिलीजला चौथा आठवडा पूर्ण करण्याआधी मुंज्याने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर ‘मुंज्या’ने 118.51 कोटींची कमाई केली आहे.