सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विविध अनेक मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, तसेच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत भाजपाने कायदे किंवा नियम शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत प्रत्त्युत्तर दिलं आहे.

 

अंबादास दानवे काय म्हणाले?

“भारतीय जनता पार्टीने नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना आणि १५० खासदारांना संसदेमधून निलंबित केलं होतं. त्यामुळे भाजपाने संसदीय भाषा आणि नियम, कायदे उद्धव ठाकरे यांना आणि मला शिकवण्याची गरज नाही. प्रसाद लाड हे राजकारणात नवीन आहेत”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.