
पुणे : शहरात झिकाचे सहा रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. झिकाचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असल्याने महापालिकेने त्यांच्या तपासणीवर भर दिला आहे. एरंडवणे, मुंढवा आणि डहाणूकर कॉलनी परिसरात झिकाचे रुग्ण आढळून आले असून या परिसरातील ४१ गर्भवतींचे रक्त नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.
झिका विषाणूचा धोका हा गर्भवती आणि तिच्या गर्भाला असतो. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने झिका विषाणूचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील गर्भवतींची तपासणी सुरू केली आहे. एरंडवणे परिसरात एकूण ७२ गर्भवती असून, त्यातील १४ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर मुंढवा परिसरातील ६० पैकी १८ गर्भवतींचे नमुने आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील ३५१ पैकी ९ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने एनआयव्हीकडे पाठविले आहेत.




