सध्या सोशल मीडियात मनोरंजनासाठी रिल्स तयार करून शेअर करण्याची वेगळीच क्रेझ आहे. इन्स्टाग्रामवर, फेसबुकवर पोस्ट टाकणं, व्हॉटसअॅपवर स्टेटस बदलणं, मेसेजेस पाठवणं आणि त्यांवरील रिप्लाय, लाईक्स, कमेंटस् बघणं, त्यासाठी वेळ खर्ची घालणं, ही आज असंख्य तरुण-तरुणींची दिनचर्या झाली आहे.
यात शासनाने ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना जाहीर केली. यामुळे नेटकऱ्यांना मनोरंजक रिल्स तयार करण्याची चांगलीच संधी मिळाली. अहिराणी भाषेत काहींनी ‘दादा लाडका दाजीले बी काहीतरी द्या’ अशा रिल्स तयार केल्यात तर काहींनी विनोदाने ‘शेतकरीले पाचशे रुपया महिना, अन बायकोले पंधराशे रुपया, शेती करू का दुसरी बायको करू काही समजत नही’.
दुसऱ्याने ‘नकोरे बाबा आता बायको मुख्यमंत्रीनी बहीण शे बरं, जर तरास दिधा, तर जेलमाच जाशी भो’. एकाने लांबच लांब रांगेचे शूटिंग घेऊन, ‘मतदानले काबर एव्हढी रांग लावतं नहीत’ असा प्रश्न केलाय. तर एका बालकाने ‘वा रे सरकार. स्त्री-पुरुष समानता अन योजना फक्त महिलांसाठीच बस प्रवास निम्मी भाड्यात, आता पंधराशे रुपये, आम्ही लाडके नाहीत का, आम्ही काय गुगलवरून डाउनलोड व्हयेल आहोत का?’ अशा मनोरंजक रिल्स सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल केल्या आहेत.
कोणत्याही म्हणजे अगदी शब्दशः कोणत्याही प्रसंगाचे छोटे-छोटे व्हिडिओ बनवून त्या रिल्स आपल्या खात्यावर अपलोड करायच्या आणि आपल्याशी जोडलेल्यांच्या प्रतिक्रियांमध्ये रमून जायचे हा आज बहुतांश जणांचा ‘उद्योग’ बनला आहे. यामध्ये ज्यांचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत, त्यांना तर या माध्यमातून कमाईच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागात रिल्सच्या माध्यमातून ‘लाडक्या बहिणीची’ सर्वत्र चर्चा होत आहे.