पावसाळ्यात रस्ते निसरडे होणे, धुकं दाटून रास्ता अंधुक दिसणे, दरड कोसळणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे घाट रस्त्यांमध्ये अपघाताची शक्यता असते, मात्र तुमचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक असतात. तसेच, गाडी चालवताना योग्य गियरचा, ब्रेक्स आणि दिव्यांचा वापर करणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. पावसाळ्यात घाट रस्त्यांवर गाडी चालवताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या पाहा.
१. योग्य गियरचा वापर करा
घाट रस्त्यांमध्ये किंवा चढावर असताना वाहन चालवताना खालच्या [सर्वात कमी] गियरमध्ये गाडी चालवणे फायदेशीर ठरू शकते. गाडी उतारावर असताना, वाहन अधिक वेगवान असते. अशावेळेस वाहनावर उत्तम नियंत्रण ठेवण्यासाठी गाडी योग्य गियरमध्ये असणे आवश्यक असते.
२. योग्य ब्रेक्सचा वापर
गाडी उतारावरून खाली येत असताना, पॅडलने ब्रेक मारण्यापेक्षा इंजिन ब्रेकिंग पद्धत सर्वात उपयुक्त ठरू शकते. उतारावर गाडी चालवत असताना, सतत पॅडल ब्रेक मारल्याने, ब्रेक पॅड गरम होऊन खराब होऊ शकते. परिणामी ब्रेक फेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे, उतारावर खालच्या गियरमध्ये गाडी चालवून, इंजिन ब्रेकिंग पद्धतीचा अवलंब करू शकता.
३. वाहतूक नियम पाळा :
रस्त्यावरील चिन्ह पाहा
डोंगराळ भागात गाडी चालवताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या चिन्हांकडे लक्ष देऊन त्यांचे पालन करा. अशी चिन्ह रस्त्यावर पुढे कोणत्या गोष्टी येऊ शकतात, पुढे रास्ता कसा आहे या सर्व आवश्यक गोष्टींची माहिती देत असतात.
लेनची शिस्त पाळा :
ये-जा करणाऱ्या वाहनांनी रस्त्याच्या कोणत्या भागातून गाडी चालवावी यासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवलेल्या असतात हे आपण पहिले आहे. घाट हे वळणावळणांच्या रस्त्यांनी भरलेले असतात. अशा वेळेस लेनचे नियम मोडल्यास, चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवल्यास अपघाताची संभावना अधिक असते. प्रवास सुरक्षितपणे करायचा असल्यास, तीव्र आणि नागमोडी वळणांवरचे अपघात टाळायचे असल्यास प्रत्येक चालकाने लेनचे नियम पाळावे.
यासर्वगोष्टींव्यतिरिक्त, पावसाळ्यात, घाटामध्ये किंवा वळणाच्या रस्त्यांवर विनाकारण वेगाने गाडी चालवणे टाळावे.
तसेच, ओव्हरटेक करू नये. ब्रेक्सप्रमाणे, वाहनाच्या दिव्यांनीदेखील चालक एकमेकांना सूचना देण्याचे काम करू शकतात.
वादळी वातावरणात रस्त्यावरील इतर वाहने, रस्त्यावरील चिन्हे आणि रस्ताही दिसणे अवघड होऊन बसते. अशा पावसाळी वातावरणात गाडीने फिरताना पुढील काळजी घ्याल.
१. पावसाळ्यात रस्त्यावर ओलाव्यामुळे गाड्या घसरण्याची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे वेगाने गाडी चालविण्याचा मोह टाळावा.
वाहनाचा वेग ताशी ६०-७० किमी असेल तर अचानक ब्रेक मारण्याची परिस्थिती उद्भवल्यास वेग कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता कमी होते.
२. गाडी रस्त्याच्या मध्यभागी चालवा, कारण पाणी रस्त्याच्या बाहेरील बाजूस साचते. ऑफ रोड ड्रायव्हिंग टाळा. रस्त्याबाहेरील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज करणे अवघड असते.
३. पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा. तुमची गाडी ही पुढच्या वाहनापासून पुरेशी दूर असेल तर ती तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या मागच्या गाडीला पावसाळी धुरकट रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये योग्य तेवढा reaction time देऊ शकते.
४. पावसात गाड्यांचा अंदाज येत नसल्याने सिग्नल फॉलो करुन गाडी चालवा. शक्यतोवर तुमच्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा. यामुळे समोरची गाडी मार्गातील पाणी सारत पुढे जात असल्याने तुम्हाला पुढच्या पाण्याचा अंदाज घेऊन चालवणे सोपे होते.
तसेच गाडीची लेन चेंज करायची झाली तर सिग्नल द्यायचा लक्षात ठेवा.
५. गाडीचे ब्रेक, टायर, हेडलाईट आधीच चेक करुन घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात होणारी फसगत यामुळे टळू शकते.
६. मोठी वाहने जसे ट्रक अथवा बसेस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका. ह्या वाहनांची चाके मोठी असल्याने रस्त्यावरील खड्डे चाकाखाली आल्यावर मोठे फवारे उडतात, चिखल उडतो. यामुळे रस्त्यावरील इतर गोष्टी दृष्टीस पडणे अवघड होते.
७. पावसाळी अथवा निसरड्या परिस्थितीत वाहन चालवितांना जास्त सतर्क रहा. तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष ठेवा.
८. करकचून ब्रेक लावल्यास वाहनाची चाके एकदम लॉक होतात आणि वाहन घसरू शकते. त्यामुळे एकदम वेग वाढविणे आणि एकदम ब्रेक दाबणे टाळावे. ब्रेकचा वापर करण्यापेक्षा, तुमच्या गाडीचा वेग हळू ठेवावा. तसेच, अचानक वळू नये.
यामुळे वाहन पल्टी होऊ शकते. वळणा-वळणाच्या रस्त्यावर अधिक सावधान राहावे आणि वाहन हळू चालवावे. तसेच, स्टिअरिंग हळूहळू फिरवावे.
९. जरी तुम्ही गाडी दिवसा चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाईट चालू ठेवा. ते तुम्हाला तर रस्त्यावर दिसण्यास मदत करतीलच, शिवाय इतर वाहनांनाही तुमच्या वाहनाची जाणीव करून देईल.
कित्येक राज्यांमध्ये दिवसासुद्धा गाड्यांचे हेड लाईट्स चालू ठेवणे बंधनकारक आहे.
१०. तुमच्या गाडीचे windshield wipers हे उत्तम अवस्थेत असू द्या. ते वेळीच तपासून पहा. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी जीर्ण झालेले ठिसूळ वायपर्स बदलून टाका.
११. वाहत्या पाण्याखाली जमीन दिसत नसल्यास त्यातून गाडी चालवू नका.पावसामुळे दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज पटकन लागू शकत नाही. रस्त्याचा अंदाज नसेल तर अतिउत्साहात गाडी चालवू नका.
१२. अनिश्चित खोलीच्या डबक्यांमधून वाहन चालवितांना सावकाश जा. डबक्याची खोली जर तुमच्या वाहनाच्या दरवाजाच्या तळापेक्षा जास्त असेल, तर दुसरा मार्ग शोधा. डबकी वा साठलेल्या पाण्यामुळे हायड्रोप्लेनिंगची शक्यता अधिक वाढते.
गाड्या पावसात खूप वेगाने जात असतात त्यावेळी हायड्रोप्लेनिंगची समस्या उद्भवते.
जेव्हा गाड्या खूप वेगाने जात असतात तेव्हा गाड्यांचे टायर्स आणि रस्ता यांच्या मध्ये पाण्याचा एक thin layer तयार होतो. यामुळे गाडी रस्त्यालगत चालत नसते.