
मुंबई : भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीत सुमारे सात ते आठ लाख क्रिकेटप्रेमी सहभागी झाल्यामुळे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. मोठया क्रिकेटप्रेमी रेल्वेने सीएसएमटी आणि चर्चगेट, मरिन लाईन्स रेल्वे स्थानकांवर दाखल झाल्याने रेल्वे पोलिसांची तारांबळ उडाली होती.
दक्षिण मुंबईत वाढलेल्या गर्दीचा लोंढा आवरण्यासाठी आणि गर्दी पांगविण्यासाठी रेल्वे पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवावा लागला. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यानच्या रस्त्यावर क्रिकेटप्रेमी दिसत होते. मरिन ड्राईव्ह परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे ७ ते ८ लाख क्रिकेटप्रेमी या मिरवणुकीत सहभागी झाले होते, असा अंदाज रेल्वे पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २००७ साली टी-२० विश्वचषकाच्या विजयी मिरवणुकीचा अभ्यास केला. यावेळी अधिक गर्दी होण्याची शक्यता होती. त्यानुसार नियोजन करून १०० ते १५० सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुपारी ३.३० वाजेनंतर क्रिकेटप्रेमींची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली. नियोजित केलेल्या अंदाजापेक्षा तिप्पट गर्दी वाढल्याने, राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पोलीस यांना पाचारण करण्यात आले. १०० गृहरक्षक, ५० रेल्वे पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे १०० अधिकारी, कर्मचारी तैनात केले होते. तसेच चर्चगेटमधील चिंचोळे प्रवेशद्वार बंद करून, फक्त मर्यादीत प्रवेशद्वार खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, अशी माहिती रेल्वे पोलिसाचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

)


