सातारा : महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन हंगामाला सुरूवात झालीय. पावसाचे आगार असलेल्या महाबळेश्वरमध्ये दीड महिन्यात 55 इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळं वेण्णा तलाव तुडुंब भरून वाहत असल्याचं बघायला मिळतय. तर वेण्णा तलाव हा महाबळेश्वर आणि पाचगणीची जीवनवाहिनी मानला जातो.
पावसानं 50 इंचाचा टप्पा ओलांडला : महाबळेश्वरला पावसाचं आगार समजलं जातं. याठिकाणी दीड महिन्यात एकूण 55.4 इंच इतका पाऊस झाला आहे. पावसानं 50 इंचाचा टप्पा गाठताच वेण्णा तलाव तुडुंब होतो. परंतु, 12 जुलैपर्यंत 55 इंच पाऊस झाल्यानं वेण्णा तलाव तुडुंब भरून वाहू लागलाय. तसंच तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहतय. त्यामुळं वेण्णा तलाव परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय.
महाबळेश्वर हरवलं धुक्यात : महाबळेश्वरमध्ये सध्या पाऊस आणि धुकं पाहायला मिळतंय. या धुंद वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. दाट धुक्यात पर्यटक सेल्फी घेताना दिसताय. तसंच हौशी पर्यटक घोडेस्वारीचाही आनंद लूटत आहेत. तसंच खरेदीसाठी पर्यटकांची महाबळेश्वरच्या बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे.
महाबळेश्वरात 1500 मिलीमीटर पावसाची नोंद : महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळं नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. 1 जून ते 13 जुलै पर्यंत महाबळेश्वरमध्ये 1515 मिलीमीटर (55.004 इंच) पावसाची नोंद झाली असून गेल्या 24 तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 119 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत नवजामध्ये सर्वाधिक 1863 पावसाची नोंद झाली आहे.




