लोकसभा निवडणुकांचा निकाल लागून आता बरेच दिवस झाले आहेत. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन देखील झालं आहे. मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी अजूनही पराभूत उमेदवारांना त्यांचा पराजय पचवता आला नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच नगरचे भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्या विजयावर आक्षेप घेतला होता. अशात आता नारायण राणे यांच्या विजयावरही आक्षेप घेण्यात आला आहे.
भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी दाखल केली आहे. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. नारायण राणेंचा 47858 मतांनी विजय झाला. मात्र, राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने केला आहे. याबाबत त्यांनी याचिका देखील केली आहे.


