पिंपरी : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचत राहत आहे. त्यामुळे दुर्गंधी व डासामुळे डेंगू चे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या डेंगू आजाराबाबत तातडीने उपयोजना करून शहर डेंगूमुक्त शहर करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पावसाळा सुरू असल्याने शहरात साथीच्या आजाराने रुग्ण वाढत असून शहरात डेंगू रुग्णांची संख्या देखील कमालीची वाढत आहे. अनेक सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी, पाणी साचत असलेली डबकी, झाडाची कुंडी, पाळीव प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेली भांडी, टायर, मोकळे डब्बे, आदी ठिकाणी पाणी साठले जाते. त्या साठवलेल्या पाण्यात डेंगू डासउत्पत्ती वाढत असल्याने शहरात डेंग्यू रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून आरोग्य विभागाला फवारणी, सर्वेक्षण करून उपाय योजना करावी. तसेच शहरातील बाधित रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात बेड व औषध उपलब्ध होत नसून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात औषधाचा देखील तुटवडा भासत आहे. हि खूप गंभीर बाब असून, पाण्याची साठवणूक करून योग्य ती काळजी न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्यावर कडक कारवाई कारवाई करण्यात यावी. सामान्य नागरिकांना मोफत उपचार करावेत. असे नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शहरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे नाना काटे यांनी केले आवाहन
सामान्यतः डेंग्यूची लक्षणे:
१) स्नायू आणि सांधेदुखी
२) शरीरावर लाल खुणा जे काही वेळाने बरे होतात आणि नंतर परत येतात.
३) उच्च ताप
४) तीव्र डोकेदुखी
५) डोळ्यांच्या मागे वेदना
६) उलट्या होणे आणि चक्कर येणे
तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक उपचार सुरू करा. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आरोग्यदायी उपायांबद्दल केवळ एक चांगला डॉक्टरच सांगू शकतो. उपायापेक्षा प्रतिबंध बरा असतो. त्यामुळे डेंग्यूचा संसर्ग कसा टाळता येईल आणि या आजारापासून बचाव करून निरोगी जीवनशैली जगता येईल ते करावे.
डेंग्यू टाळण्यासाठी उपाय :-
- तुम्ही तुमची राहण्याची जागा आणि आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण स्वच्छतेची काळजी स्वतः घेतली पाहिजे.
- आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून, आपण सहजपणे डासांना दूर ठेवू शकता.
- कोणत्याही ठिकाणी पाणी साचू देऊ नका:
- काही ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊ शकते आणि त्यामुळे डेंग्यूचा प्रसारही होऊ शकतो. ज्या भांड्यांमध्ये बराच काळ वापरायचा नाही त्यामध्ये ठेवलेले पाणी नियमितपणे बदला.
- दर आठवड्याला कुंडीतील पाणी बदलत राहा. मॅनहोल, सेप्टिक टाक्या, अडवलेले नाले आणि विहिरी इत्यादी ठिकाणे नियमितपणे तपासत रहा.
- डास प्रतिबंधक मशीन आणि जाळीचा वापर करा.
- डासांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, सर्वप्रथम, जेव्हाही तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा मच्छरनाशक क्रीम वापरा आणि झोपण्यापूर्वी मच्छरदाणी व्यवस्थित लावा.