राज्यभरात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आता वायसीएम रूग्णालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा अहवाल फेटाळण्यात आला आहे.
आयएएस पूजा खेडकर प्रकरणात पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा अहवाल फेटाळण्यात आलेला आहे. पिंपरी पालिकेचे आयुक्त शेखर सिंहांनी चौकशी अहवालात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. पूजा खेडकरांची तपासणी शिकाऊ डॉक्टरांनी कशी काय केली? कोणत्या पुराव्यांच्या आणि तपासणीच्या आधारे अपंगत्व ठरविण्यात आलं? फिजिओथेरपीस्टने डाव्या गुडघ्यात इजा आढळली नाही, असं नमूद केलं असताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय दिले? हे प्रश्न उपस्थित करणारी कागदपत्रे एबीपी माझाने समोर आणली होती,
त्यानंतर डॉ वाबळेंनी सादर केलेला चौकशीचा अहवाल आयुक्तांनी फेटाळला आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नांचा उल्लेख करत पुन्हा चौकशी करावी आणि अहवालात सुधारणा करावी. असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आता सोमवारी अथवा मंगळवारी चौकशीचा हा सुधारित अहवाल सादर केला जाईल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



