पिंपरी : आलिशान मोटार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक झाली. यात मोटार चालक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गात २९ जुलै रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा अपघात झाला.
यश मित्तल (२९, रा. आकुर्डी) असे जखमी मोटार चालकाचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा त्याच्या ताब्यातील मोटार घेऊन ऑटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गातून जात होता. त्याचवेळी एका खासगी शैक्षणिक संस्थेची स्कूलबस बीआरटी मार्गातून समोरून येत होती. मोटार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक झाली. यात मोटारीचे तसेच स्कूलबसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बीआरटी मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.




