पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 262 पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. भरतीची लेखी परीक्षा 10 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ताथवडे पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे होणार आहे. दरम्यान 19 जून ते 11 जुलै या कालावधीत झालेल्या मैदानी चाचणी मधून सामाजिक व समांतर आरक्षण या बाबींचा विचार करत 1:10 या प्रमाणानुसार 2989 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यात 9 हजार 595 पोलीस शिपाई पदे, 1 हजार 686 चालक पोलीस शिपाई पदे, 4 हजार 449 सशस्त्र पोलीस शिपाई पदे, 101 बॅंण्डसमन पदे, 1 हजार 800 कारागृह पोलीस शिपाई पदांची भरती सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 262 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 79 पदे, महिला 78 पदे, खेळाडू 15 पदे, प्रकल्पग्रस्त 14 पदे, भूकंपग्रस्त 4 पदे, माजी सैनिक 41 पदे, अंशकालीन पदवीधर 11 पदे, पोलीस पाल्य 7 पदे, गृहरक्षक दल 13 पदे, अनाथ 3 पदे राखीव आहेत.
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून 1:10 प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले आहे. त्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 40 टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
12 हजार उमेदवार मैदानी मधूनच बाहेर
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 262 जागांसाठी राज्यभरातून 15 हजार 42 अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासह पदव्युत्तर पदवी धारकांचा देखील समावेश होता. दोन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील अर्ज केला. मात्र मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होऊन लेखीसाठी अवघे दोन हजर 989 उमेदवार पात्र ठरले. उर्वरित 12 हजार 53 उमेदवार मैदानी चाचणी मधूनच बाहेर पडले.




