पुणे : लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्ति यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई केल्यानंतर आता वेळेचे बंधन न पाळणार्या बारवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. वडगाव मावळ व कामशेत येथील दोन ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई केली आहे.
दीपा बार अँड रेस्टॉरंट (कामशेत) आणि फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट (वडगाव मावळ) अशी कारवाई केलेल्या बारची नावे आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्याकरीता प्रशासनाने वेळेचे बंधन घालून दिले आहे. असे असताना काही हॉटेल ते बंधन पाळत नसल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना समजली.
त्याची खातरजमा करण्यासाठी कार्तिक व त्यांच्या पथकाने मध्यरात्रीनंतर ऑर्केस्ट्रा बारची तपासणी सुरु केली. त्यात या दोन ऑर्केस्ट्रा बारमध्ये वेळेचे बंधन न पाळता त्यानंतर ग्राहकांना खाद्य पदार्थ, दारु यांची विक्री केली जात असताना दिसून आले. या दोन्ही बार मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम ३३ (डब्ल्यु) १३१ अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणार्या हॉटेलचालकांवर कठोर कायदेशीर कारवाई यापुढेही सुरुच राहणार आहे. हॉटेलचालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.