
आम आदमी पक्षाचे चेतन बेंद्रे यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या फडात शड्डू ठोकला असून https://chinchwadchachetan.com ही वेबसाईट लॉन्च करत विधानसभेसाठी कँम्पेन सुरू केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘आप’ ने मोठ्या जोमाने कंबर कसली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आयटी वर्ग मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे. याच मतदारसंघात असंघटित कामगार, घरेलू कामगार यांचीही मोठी संख्या आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील सर्वच नागरिक प्रामाणिकपणे कर भरत आहेत. परंतु मतदारसंघात त्यांचा योग्य प्रतिनिधी नसल्यामुळे त्यांची आर्थिक लूट होत आहे. शहरात इतरही प्रश्न ‘आ वासून’ उभे आहेत. वाहतूक कोंडींचा प्रश्न तर पिंपरी चिंचवडकरांच्या पाचवीला पुजला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचीच इच्छा आहे की आपले प्रश्न मांडणारा एक प्रतिनिधी मतदारसंघात हवा आहे, त्यांनी पर्याय शोधले पण असा खंबीर लोकप्रतिनिधी त्यांना भेटलाच नाही.
‘चिंचवडचा चेतन’ ही वेबसाईट लॉन्च करण्यात आली असून या कँम्पेनच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न मांडले जातीलच, परंतु त्याचबरोबर ते मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी माहिती ‘आम आदमी पार्टी’ चे महाराष्ट्र राज्याचे पदवीधर आघाडीचे अध्यक्ष ‘चेतन बेंद्रे’ यांनी दिली.
यावेळी चिंचवड मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षा मीनाताई जावळे, उद्योग आघाडीचे सचिव संतोषजी इंगळे, प्रचार प्रमुख अय्याज शेख, उपाध्यक्ष राज चाकणे, मीडिया प्रमुख यशवंत कांबळे, संघटक संजय मोरे, रणधीर नायडू आदी उपस्थित होते. याचसोबत ‘आप’ चे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही उपस्थिती लावली.




