पुणे : पुण्यात मेट्रो सुरु झाल्यानंतर दळणवळणाचे आणखी एक साधन हळूहळू डेव्हलप होत आहे. वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गावरील येरवडा मेट्रोस्थानकाचं काम पूर्ण झालं आहे. आजपासून येरवडा स्थानक सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून पुणेकरांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
इतर मेट्रो स्थानकांप्रमाणेच आता येरवड्यातून प्रवाशांना मेट्रोमध्ये बसता येणार आहे. प्रवाशांची संख्या वाढणे आणि पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करणे यासाठी या स्थानकाच्या प्रवासी सेवेचा उपयोग होणार आहे. येरवडा मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याने वनाज ते रामवाडी पर्यंत मेट्रो लाईन पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे.
या स्थानकामुळे येरवडा रहिवासी भाग उर्वरित मेट्रो नेटवर्कसोबत आणि पुणे शहरासोबत जोडला जाईल. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाच्या जवळ असणाऱ्या आयटी हब मधील कर्मचारी आणि रहिवाशांना फायदा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या सेवेत आणखी एक स्टेशन दाखल झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय.
६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, पुणे महानगरपालिका (पीएमसी) कलस धानोरी प्रभाग कार्यालयाला लागून असलेल्या येरवडा मेट्रो स्थानकाच्या एका प्रवेश-एक्झिट पॉइंटचे काम पूर्ण झाले होते. तथापि, येरवडा स्थानकाचा दुसरा प्रवेश-एक्झिट पॉईंट पुन्हा करावा लागेल कारण जिने अहमदनगर रोडवर वाहतूक कोंडी होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे पुणे मेट्रोने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येरवडा स्थानकावरील काम बंद पाडून ते यावर्षी फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू केले.
येरवडा हे रुबी हॉल क्लिनिक आणि रामवाडी दरम्यानच्या 5.5 किमी अंतरावरील महत्त्वाचे स्थानक आहे कारण प्रवाशांना अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या बंड गार्डन स्टेशनचा वापर करावा लागतो.




