नवी दिल्ली: ब्रिटनचे बिल गेट्स’ नावाने प्रसिद्ध असलेले उद्योजक माईक लिंच यांची लक्झरी याच (बोट) बुडाल्यापासून ते बेपत्ता आहेत. यामुळे ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
इटालीमधील सिसिली बेटाची राजधानी असलेल्या पालेर्मोजवळ माईक लिंच यांची याच बुडाल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी हा अपघात घडल्यापासून लिंच यांचा शोध सुरु असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. वादळ आल्याने ही बोट बुडाल्याचं सांगितलं जात आहे.
59 वर्षीय माईक लिंच यांना सॅन फ्रॅन्सिस्कोमधील कोर्टाने फसवणूक प्रकरणामध्ये मोठा दिलासा देत जून महिन्यात निर्दोष मुक्तता केली होती. आपल्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून झालेल्या विक्रीसंदर्भातील व्यवहारामध्ये घोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या विजयानंतर लिंच यांनी याचवर काही जवळच्या लोकांना विशेष पार्टी दिली होती. त्याचवेळी हा अपघात झाला.
माईक लिंच यांच्याबरोबर या आलिशान बोटीवर त्यांची 18 वर्षांची मुलगी, मॉर्गन स्टॅनली या कंपनीचे अंतरराष्ट्रीय अध्यक्ष जॉनथन ब्लूमर, वकील ख्रिस मार्व्हिलो आणि त्यांच्या पत्नीही होत्या. हे सर्वजण सोमवारपासून बेपत्ता आहेत. आता स्कुबा डायव्हर्सच्या मदतीनेही या सर्वांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
माईक लिंच यांच्या या जलसमाधी मिळालेल्या याचचं नाव ‘बायसीयन’ असं आहे. या आलिशान बोटीला अपघात झाला तेव्हा त्यावर एकूण 22 जण होते. त्यापैकी 15 जणांना वाचवण्यात यश आलं असून यामध्ये लिंच यांची पत्नी अँजेला बॅकरसचाही समावेश आहे.




