ejanashakti : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते महामंडळाकडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या फेरनिविदा पुन्हा राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्या असून प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य होताच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. यासाठी ऑक्टोबर महिना उजाडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुणे रिंगरोडची लांबी 174 किलोमीटर आहे. 110 मीटर रुंदीचा हा रस्ता पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पुणे रिंगरोडसाठी काही कंपन्यांकडून देण्यात आलेल्या निविदा सन 2017-18 वर्षाच्या तुलनेत 16 ते 17 टक्क्यांनी ज्यादा दराच्या आहेत. तर काही कंपन्यांनी सध्याच्या चालू बाजारभावाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढीव तसेच काही कंपन्यांचे दोन टक्के कमी दराच्या निविदा आहेत.
रस्ते विकास महामंडळाकडून कंपन्यांशी दराबाबत वाटाघाटी करण्यात येत आहेत. त्यानंतर दर निश्चितीबाबतचा सुधारित अंतिम प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान विविध कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या जादा दराच्या निविदा कमी करण्यात आलेल्या आहेत.
पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागात हा रिंगरोड होणार आहे. पूर्व मार्गात मावळ तालुक्यातून 11, खेड 12, हवेली 15, पुरंदर पाच, भोर तीन गावांतून हा रिंगरोड जाणार आहे. तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील एक, हवेली 11, मुळशी 15 आणि मावळ मधील सहा गावांमधून हा रस्ता जाईल.




