पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. आंदेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकारवर गोळीबार करण्यात आल्याने मध्यभागात घबराट उडाली.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली.
गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.




