
पुणे : पीएमआरडीए पेठ क्रमांक १२ मध्ये सदनिका उभारल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या सदनिकांबाबत विविध तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी या बाथरूम, टॉयलेट, टेरेस, पाणी टाकी गळतीबाबत होत्या. याबाबत सदनिकाधारकांनी अनेक वेळा कार्यालयाकडे पत्रव्यवहार केले. मात्र, त्याची दखल घेतली नव्हती. दरम्यान, संबंधित कंत्राटदार ऐकत नसल्याने खुद्द महानगर आयुक्तांनी गेल्या महिन्यात नोटीस दिली होती. मात्र, मुदतीत काम पूर्ण केले नाही. कामे अर्धवट असतानादेखील पुन्हा त्या बांधकाम व्यवसायांना वेळ वाढवून देण्यात आली आहे.
पीएमआरडीएने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सेक्टर १२ या ठिकाणी गृहप्रकल्प एक आणि दोन या ठिकाणी एकूण ४ हजार ८८३ सदनिका उभारल्या असून जवळपास ७० टक्के लाभार्थी वास्तव्यास आहेत. सदनिकाधारकांना या ठिकाणी वास्तव्यास आल्यापासून गळतीची समस्या आहे. त्यामुळे एक, दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा सोसायटीधारकांनी याबाबत पत्रव्यवहार केला. मात्र याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. तब्बल साडेसातशेपेक्षा अधिक घरांना गळती लागली होती. यानंतर आयुक्तांनी याबाबत कामाची गती वाढवण्याचे आदेश दिले होते, पण कंत्राटदाराच्या कामाची गती अपेक्षितरित्या नसल्यामुळे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गृहप्रकल्प एक आणि दोन येथील कंत्राटदारास १४ ऑगस्ट रोजी नोटीस बजावली. त्या वेळी महिनाभरात हे काम पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच, नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, असेही बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले होते.
दरम्यान, महिना उलटूनदेखील या ठिकाणचे काम पूर्ण झाल्याने आयुक्तांनी शुक्रवारी (२० सप्टेंबर) बैठक बोलावली होती. मात्र, आयुक्त इतर बैठकीत व्यस्त असल्याने प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्राधिकरणाची स्थापत्य आणि विद्युत कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि बांधकाम व्यवसाय अभियंता उपस्थित होते. यावेळी कामाची सद्यस्थिती मागवून घेतली. त्यावेळी अद्यापही काही कामे प्रलंबित राहिली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे आता या बांधकाम व्यावसायिकास पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे. मात्र ही मुदतवाढ अंतिम असल्याचे प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
केवळ ४० तक्रारी शिल्लक असल्याचा दावा
सदनिकाधारकांच्या जवळपास साडेचारशे ते पाचशे तक्रारी होत्या. मात्र, त्यातील बऱ्याच तक्रारींचे निरसन केल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ ३० ते ४० तक्रारी उरलेल्या आहेत. त्या देखील वेळेत पूर्ण करण्याबाबत दोन्ही बांधकाम व्यावसायिकांनी आश्वासन दिले आहे.
आता ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत
सेक्टर १२ गृहप्रकल्प उभारणारे शांती आणि यश नंदन या दोन बांधकाम व्यावसायिकांना प्राधिकरण कार्यालयात बोलावून घेण्यात आले होते. त्याबाबत कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने अधिकाऱ्यांनी कामाबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, उरलेली सगळी कामे वेळी पूर्ण करून देतो. त्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत वेळ द्या, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली. त्यानुसार त्यांना वेळ देण्यात आलेली आहे.




