
आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीटवाटपाचा फॉर्म्युला आणि युतीधर्म पाळण्यावरून महायुतीत मिठाचा खडा पडलेला दिसत असतानाच आता महाविकास आघाडीत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) आमदार असताना या जागेवर शिवसेना आणि भाजपने दावा केला होता, तर चिंचवडमध्ये भाजपचे आमदार असताना या ठिकाणी राष्ट्रवादीने दावा केला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी बैठक घेऊन चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावर दावा केला आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने भोसरीमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा ठराव करून याचा निरोप मातोश्रीवर पाठवणार असल्याचे सांगितले आहे. त्याच बरोबर वेळप्रसंगी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाचे कोणतेही अस्तित्व नसताना लोकसभेला तुतारी वाजवीत शिरूरमध्ये खासदार निवडून आणले. आपण आपली मशाल पेटवण्यासाठी सक्षम असताना आता परत भोसरीत तुतारीच फुंकायची असेल तर वेळप्रसंगी राजीनामा देऊ; असा पवित्रा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे भोसरी विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून इच्छुक असणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्याने ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी एक बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला, तसेच आम्ही राजीनामेही देऊ. पण हा निरोप मातोश्रीवर जायला हवा, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतली आहे. भोसरीत स्व. भिवाजी सहाणे सभागृहात शिवसेना (उबाठा) गटाची बैठक पार पडली. सुलभा उबाळे, धनंजय अल्हाट आणि अन्य पदाधिकारी, भोसरीतील शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. पिंपरी आणि भोसरी विधानसभेत शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर किंवा काँग्रेसने उमेदवार दिला, तर त्यांचे काम आम्ही करणार नाही. भोसरी आणि पिंपरीत मशाल चिन्हचे हवे, असा आग्रह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. तसे झाल्यास, महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या अपेक्षेने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले आणि गेल्या दोन महिन्यांपासून मोठी तयारी करीत असलेले माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निष्ठावंत शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विश्वासातील नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. २००९, २०१४ अशी दोन वेळा त्यांनी भोसरी विधानसभा निवडणूक लढवली होती. सुरुवातीला माजी आमदार विलास लांडे यांच्या विरोधात थोडक्या मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. २०१४ मध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. २०१९ मध्ये त्यांनी महायुती धर्माचे पालन केले आणि आमदार महेश लांडगे यांचा विजय सोपा केला होता. आता सुलभा उबाळे यांना उमेदवारीसाठी प्रखर दावेदार मानले जाते. मात्र, पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळावी म्हणून अप्रत्यक्ष ‘दबावगट’ तयार केला जात आहे.
दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदारसंघावर दावा करताना दबावगट तयार करण्याचा प्रयत्न भाजपकडून नुकताच करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी एक बैठक पार पडली. यामध्ये भाजपचे आमदार असणाऱ्या भोसरी, चिंचवड विधानसभेवर दावा करून, तसा ठराव बहुमताने करीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पाठवला आहे. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक मध्यवर्ती कार्यालयात रविवारी पार पडली. या बैठकीत भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात आपली ताकद असून आगामी निवडणुकीत तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) सोडण्यात यावेत, असा बहुमताने ठराव करण्यात आला. यापैकी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील अधिकृत मतदारसंघ आहे. तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार आहे. त्या व्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ चिंचवड व भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत, असा ठराव शहराध्यक्ष फजल शेख यांनी मांडला. त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट यांनी अनुमोदन दिले आहे. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, मा. नगरसेवक सतीश दरेकर, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, गोरक्षनाथ पाषाणकर, नीलेश पांढारकर, बन्सी पारडे, इत्यादींसह सर्व विभागांचे अध्यक्ष, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भोसरी विधानसभा मतदारसंघ मशाल चिन्हावर शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार मिळावी. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये अनेकांनी आपापल्या भावना मांडल्या आहेत. पण, आम्ही पक्षप्रमुखांच्या आदेशाने काम करणारी मंडळी आहोत. हा मतदारसंघ शिवसेनेला द्यावा, यासाठी मागणी करीत आहोत.
-सुलभा उबाळे, संघटक, शिवसेना, (उबाठा)
आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महायुती आहे. प्रत्येकाने युती धर्म पाळावा. आम्हाला आरे केले तर कारे करण्याची ताकद आम्ही ठेवतो. शहराचा विकास अजितदादांच्या विचाराने झालेला आहे. त्यामुळे युती असताना स्थानिक पातळीवर कोणी नको ते बोलून वितुष्ट निर्माण करू नये. आज बैठकीत ठरलेले ठराव दादांकडे पाठवून दिले आहेत. पिंपरीची जागा आमचीच होती आणि राहील. आता नव्याने आम्ही भोसरी आणि चिंचवड मतदारसंघही मागितला आहे.
– मंगला कदम, माजी महापौर, पिंपरी-चिंचवड




