पिंपरी (वार्ताहर) यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विविध पिके बहरलेली आहेत. सध्या मुळशी तालुक्यातील पूर्व पट्ट्यात अनेक बांधकाम होत असली तरीही पारंपारिक शेती अजूनही करणारे शेतकरी आहेत. यंदा चांगला पाऊस झाल्याने भातपिके बहरलेली दिसत आहेत. पूर्व पट्ट्यात विशेषतः आयटीनगरी परिसरात माण, हिंजवडी, नेरे, जांबे, मारुंजी, कासारसाई परिसरात इंद्रायणी वाण असलेले भातपीक मोठ्या जोमात आहे.
पोषक हवामानामुळे इंद्रायणी भातपिकांचा फुलवरा व लोंब्या बाहेर पडू लागल्याने इंद्रायणीचा सुगंध नागरिकांचे मन दरवळून टाकताना दिसत आहे. सर्वत्र सकाळच्या वेळी दरवळणारा सुवास जांबे, मारुंजी, माण, हिंजवडी, कासारसाई परिसरातील मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे मन प्रसन्न करून टाकत आहे. अशा निसर्गरम्य परिस्थितीत जांबे येथील प्रगतिशील शेतकरी अविनाश गायकवाड यांची तुर्की बाजरी केल्याची नोंद परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली. गायकवाड यांच्या शेतीतील नवनव्या प्रयोगामुळे ते परिसरात नेहमी चर्चेत असतात.
या परिसरातील अनेक आयटी इंजिनियर्स मोठमोठ्या सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. एकीकडे आयटी कंपन्यांच्या टोलेजंग इमारती व रहिवाशी वसाहतीची सिमेंटची जंगले वाढत असताना परिसरात पारंपरिक शेती पद्धत लुप्त होत आहे. मात्र, मूळचा शेतकरी पिंड असणारे अविनाश गायकवाड यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतात पारंपारिक भातपीक करताना दिसतात. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे भात पिके बहरलेली आहेत. यामुळे या भागातून शहरात ये-जा करणाऱ्या आयटीनगरीतील अभियंत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या भागातील अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती करत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याने भाताचे चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केला.