पिंपरी : विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल आठवड्याभरात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत. आज ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंचवड विधानसभेतील अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी एकत्र येत चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसलाच पाहिजे अन्यथा भाजपचे काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
या बैठकीला माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, विनोद नढे, सतीश दरेकर, अतुल शितोळे, कैलास बारणे, माऊली सूर्यवंशी, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, हरिभाऊ तिकोने, मनोज खानोलकर, राजेंद्र साळुंखे, श्याम जगताप, शिरीष साठे, चंद्रकांत तापकीर, सचिन काळे, माजी नगरसेविका उषा काळे, सुषमा तनपुरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छूकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठवड्यात काही इच्छुकांनी पत्रकार परिषदेत घेऊन नवा चेहरा देण्यासाठी आग्रही मागणी केली होती. निवडणुका केव्हाही लागू शकतात त्यामुळे सर्व इच्छूकांनी एकत्रित बैठक घेत, हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला कसा येईल, यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी इच्छूकांनी आता चिंचवड मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेऊ. त्यानंतर कोणी निवडणूक लढायची ते ठरवू, अशी भूमिका घेतली आहे.
नाना काटे म्हणाले की, आमच्या मागणीला यश आल्यास आम्ही सर्व जण या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार आहोत. मात्र, आम्ही विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही असे ठरविले आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या सर्व इच्छुकांसह आजी माजी नगरसेवक व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत चिंचवड विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीला मिळावा, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
या शहराचा खर्या अर्थाने अजित पवार यांनी विकास केला आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणूक याबाबत आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. या चर्चेतून ठरलेला निर्णय आम्ही प्रसारमाध्यमांना कळविणार आहोत. हे शहर अजित पवार यांनी घडविले आहे. त्यामुळे हे शहर त्यांच्याकडेच राहिले पाहिजे, अशी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आग्रही मागणी आहे. या मतदारसंघात आम्ही भाजप उमदेवाराचा प्रचार करणार नाही असे एकमत झाले.