पिंपरी – रावेत बीआरटी रोडवरील फ्लायओव्हरवर दुपारी दोन पंधराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने बीव्हीजीच्या १०८ ॲम्बुलन्स सेवेचा नाकर्तेपणा उघड केला आहे. दुचाकी आणि टोईंग व्हॅनमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार मोहन गंभीर जखमी झाला. रक्ताने माखलेला जखमी माणूस रस्त्यावर तडफडत होता… पण “आपत्कालीन” म्हणून ओळखली जाणारी १०८ ॲम्बुलन्स ४० मिनिटांपर्यंत आलीच नाही!
स्थानिक नागरिकांनी एकामागोमाग एक १०८ वर डायल केले, पण कुणीच घटनास्थळी पोहोचले नाही. राज्य सरकारचा आपत्कालीन क्रमांक ‘डायल १०८’ आता केवळ नावापुरता राहिल्याचं हे दृश्य सिद्ध करत होतं! अखेर संतापलेल्या नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत मोहनला एका रिक्षामधून औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तेथे डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी स्पष्ट सांगितले जर पेशंट वेळेवर दाखल झाला असता, तर त्याचा रक्तस्त्राव थांबवून जीव वाचवता आला असता. म्हणजेच, १०८ सेवेच्या विलंबानेच मोहनचा जीव धोक्यात आला आहे.
दरम्यान, बीव्हीजी संस्थेचे डॉक्टर शेळके यांनी पत्रकारांना सांगितले की, “कॉल सेंटरमध्ये कॉल रेकॉर्ड झाला आहे, आणि आम्ही ॲम्बुलन्स पाठवली आहे. पण वास्तवात घटनास्थळी एकही ॲम्बुलन्स आली नाही!
नागरिकांनी सांगितले की, बीव्हीजीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आलेल्या पत्रकारांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर केवळ सरावासाठी म्हणून जिल्हा रुग्णालयात तीन ॲम्बुलन्स पाठवण्यात आल्या पण तेव्हा सगळं संपलं होतं!
जखमी मोहनचा पाय मोडला असून शरीरावर गंभीर जखमा आहेत. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्हा रुग्णालयात न्यूरो-आयसीयू नसल्याने डॉक्टरांनी त्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला.
या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी बीव्हीजी कंपनी आणि १०८ सेवेवर सडकून टीका केली. १०८ सेवा वेळेवर आली असती तर मोहन आज वाचला असता. ही सेवा आता केवळ कागदावरची आहे. दररोज कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो, पण प्रत्यक्षात जीव वाचवण्याची तत्परता नाही.
असा रोष व्यक्त करत नागरिकांनी आवाज उठवला. घटनास्थळी असलेल्या टोईंग व्हॅनवर नंबर प्लेट नव्हती, हे आणखी एक गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे.
नागरिकांचा सवाल —
जर १०८ वेळेवर येत नाही, तर ती सेवा ठेवायची तरी का?
ही घटना केवळ एका अपघाताची नाही, तर राज्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाची रक्तरंजित कहाणी आहे.
सरकार आणि प्रशासन याकडे अजूनही डोळेझाक करत राहणार का?
नागरिक आता शांत बसणार नाहीत, बीव्हीजी आणि १०८ सेवेच्या विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे!