लोणावळा | २१ जुलै २०२५ –
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका मालवाहू टेम्पोच्या धोकादायक व बेदरकार ड्रायव्हिंगमुळे अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला. वाहतूक पोलिसांनी आणि MSRDC यांच्यावतीने कार्यान्वित केलेल्या CCTV कॅमेऱ्यांद्वारे दंड वसूल करण्यापुरती भूमिका न बजावत, प्रत्यक्षात जीवितहानी होऊ शकणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली आहे.
एका ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या ५०-६० नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या टेम्पो चालकाचा काही किलोमीटर अंतरावर थरार सुरू होता. अखेर काही सजग प्रवाशांनी पुढाकार घेत, टेम्पो थांबवून संबंधित चालकाला लोणावळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
मात्र, नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे की, पोलीस अशा प्रकारांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करतात का, की फक्त समज देऊन ‘चिरीमध्ये’ घेऊन सोडतात? या घटनांवर किती गांभीर्याने कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
यासोबतच आणखी एक गंभीर बाब लक्षात आली पावसामुळे अनेक वाहनांच्या मागील नंबर प्लेटवर चिखल जमा झाल्याने त्या वाचणे अशक्य आहे. विशेषतः ट्रॅक, मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोंची नंबर प्लेट दैनंदिन प्रवासामुळे पूर्णपणे झाकली गेलेली असल्याचे अनेक वेळा पाहण्यात येते. हे वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून, अपघातानंतर वाहन ओळखणे अशक्य होते.
वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता, प्रत्यक्ष गस्त, धोकादायक चालकांवर गुन्हे दाखल करणे, वाहनांची तपासणी आणि सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी या गोष्टी तातडीने करणे आवश्यक आहे. मुंबई-पुणे महामार्ग हा देशातील एक अत्यंत गतीमान आणि महत्त्वाचा मार्ग आहे. इथे अशा प्रकारच्या निष्काळजी वर्तनाला पूर्णपणे आळा घालण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशी भूमिका जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.