चिंचवड – प्रसिद्ध अभिनेते व वृक्षमित्र “ट्री मॅन” श्री. सयाजी शिंदे यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त आज रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. सह्याद्री देवराई फौंडेशनच्या माध्यमातून या वाढदिवसानिमित्त एका दिवसात तब्बल एक लाख वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला. फौंडेशनचे दहा लाख वृक्ष लावून 40 देवराई निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, या मोहिमेत वृक्षप्रेमींचा मोठा सहभाग आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा उपसभापती आण्णा बनसोडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच आसामचे फॉरेस्ट मॅन पद्मश्री जादव पायांग यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला.
अभिनेते सयाजी शिंदे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, जादव पायांग यांनी आजवर 12 लाख वृक्ष लावल्याची प्रेरणादायी माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विलास लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, अभिनेते सागर कारंडे, जादव पायांग यांची कन्या मुंनमुनी पायांग, सयाजी शिंदे यांचे कुटुंबीय, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे तसेच शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, जेष्ठ नागरिक, वृक्षप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.