चिंचवड: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वाचा राजकीय उलटफेर झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख सचिन आहेर होते.
मोरेश्वर भोंडवे हे मागील दीड दशकापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. भोंडवे यांच्या शिवसेनेत प्रवेशाने चिंचवडच्या राजकीय समीकरणांना नवा आकार देणारा ठरू शकतो. त्यांनी या निर्णयाबाबत बोलताना सांगितले की, “शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास असून, आपली भूमिका अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी भोंडवे यांचे स्वागत करत, “आपला पक्ष आणि विचारधारा मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम करू,” असे सांगितले. या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात विशेषता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे.
या संदर्भात भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रतिक्रिया देखील अपेक्षित आहेत, ज्यामुळे आगामी निवडणुकीच्या रणनीतीत बदल होऊ शकतो. भोंडवे यांचा शिवसेनेत प्रवेश ही एक महत्त्वाची घटना असून, मतदारसंघातील राजकीय वातावरणावर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.