भोसरी : भोसरीच्या सदगुरू नगर येथील लेबर कॅम्पमधील पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये पाच ते सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. अद्याप मृतांची नावे समोर आलेली नाहीत. तर पाण्याची टाकी कोसळली त्याठिकाणी आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन व पोलीस प्रशासन उपस्थित मदत काय॔ सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना घडली. यात पाच ते सात जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी उभारण्यात आलेली ही पाण्याची टाकी आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी ही पाण्याची टाकी महापालिकेची नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पाण्याची टाकी कोसळल्याची घटना जिथं घडली तो लेबर कॅम्प एनएनसीएल या कंपनीचा आहे. या लेबर कॅम्प मध्ये राहणारे सर्व बांधकाम मजूर आहेत. या मजुरांना आंघोळ करण्यासाठी ठेकेदाराने जवळपास 12 फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारली होती. सकाळी काही मजूर टाकी खाली आंघोळ करत होते. टाकीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने पाण्याच्या टाकीचा संपूर्ण ढाचा कामगारांवर कोसळला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
या टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.
जिथे हा लेबर कॅम्प उभारण्यात आला होता ती जागा रेड झोनची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान संबंधित टाकी महापालिकेनं उभारलेली नव्हती मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी दिली आहे. तर घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली आहे.




