पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील महायुतीने तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले असले, तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतीक्षा शहरात संभ्रम निर्माण करत आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीप्रमाणे भोसरी विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाकडून अजित गव्हाणे यांचा नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अजित गव्हाणे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होऊ शकते. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर भाजप आणि अन्य पक्षांनी आपल्या रणनीतीत बदल करण्याची आवश्यकता भासू शकते.
अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन थेट शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली. मागील दीड महिन्यापासून त्यांनी संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात घरोघरी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्याचबरोबर विद्यमान आमदारांच्या चुकीच्या कामावरती बोट ठेवून मतदारांच्या पुढे आपली प्रतिमा तयार केली आहे. याचा फायदा त्यांना निवडणुकीच्या मतदानात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मध्ये गव्हाणे विरुद्ध लांडगे यांचा सामना रंगणार आहे.




