चिंचवड (प्रतिनिधी) – चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज चिंचवड येथील आलमगीर शाही मस्जिदला भेट देवून मुस्लिम समाजातील बांधवांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. मुस्लिम बांधवांच्या अडी – अडचणी समजून घेवून त्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असेन. त्याच बरोबर वेळोवेळी मुस्लिम समाजाला मदत करण्यासाठी माझे सहकार्य असेल असे आश्वासन भाऊसाहेब भोईर यांनी दिले.
या प्रसंगी भाऊसाहेब भोईर म्हणाले की चिंचवड मतदार संघात निवासी असलेल्या मुस्लिम बांधवांचे समाजासाठी असलेले योगदान वाखणण्याजोगे आहे. हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव समाजात एकोपा जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. चिंचवड मतदार संघ सर्वधर्म समभाव जपत असून गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. समाजात एकोपा राहण्यासाठी माझा नेहमी हाच प्रयत्न असतो.
ते पुढे म्हणाले की यंदाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये कपाट हे चिन्ह मिळाले आहे. या निवडणुकीत कपाट चिन्ह विजयाचे प्रतीक ठरणार आहे. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या या शहराला सांस्कृतिक नगरी ही ओळख निर्माण करुन देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजातील बांधवांनी माझ्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.