पिंपरी : महालक्ष्मी योजनेत विरोधक महिलांना तीन हजाराचे आमिष दाखवीत आहेत. तो तर चुनावी जुमला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आकुर्डी येथील महायुती कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांनी उपस्थितांना बोलताना व्यक्त केले.
यावेळी विधान परिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, बापू काटे, संतोष तरस, कुणाल ओव्हळकर, सदाशिव खाडे, कविता आल्हाट, अनुप मोरे, शीतल शिंदे यासह महायुतीचे तिन्ही पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजनांची घोषणा केली, तेव्हा विरोधकांनी आमच्यावर आरोप केले की, या योजनांमुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीत जाईल. योजनांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत आणि या योजनांचे पैसे लोकांना मिळणार नाहीत. आता त्याच विरोधकांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक योजनांची घोषणा केली आहे. मात्र योजनांसाठी किती पैसे लागणार आणि ते कुठून आणणार याचा हिशोब माझा तोंडपाठ आहे, याउलट विरोधकांना याबाबत विचारलं असता त्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाही. विरोधकांनी जाहीर केलेल्या योजनांसाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. आम्ही जाहीर केलेल्या योजनांसाठी ७५ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. विरोधकांनी जाहीर केलेल्या योजना म्हणजे त्यांचा चुनावी जुमला आहे.
महाराष्ट्रमध्ये देशातील गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक
देशात आजच्या घडीला एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक ही फक्त महाराष्ट्रात झाली आहे. आधी महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता, आता पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योगधंदे गुजरातला गेले असं फेक नरेटीव विरोधक जाणीवपूर्वक पसरवत आहेत. आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या नाहीत, त्या महाराष्ट्रातील इतर शहरांत स्थलांतरित झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १० टक्के उमेदवार मुस्लिम समाजाकडून देण्यात आले आहेत. १२ टक्के जागा या प्रत्येकी एससी आणि एसटी समाजासाठी दिलेल्या आहेत. तसंच १० टक्के जागा महिलांसाठी दिलेल्या आहेत. मी शब्द दिला होता; सर्व समाजांना पुढे घेऊन जाणार आणि तो मी पूर्ण करत आहे. विधान परिषदेत २ जागा मिळाल्या, त्या सुध्दा ओबीसी आणि मुस्लीम समाजाला दिल्या.
लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघापेक्षा पिंपरी विधानसभेतील महिलांना झाला आहे. पिंपरी विधानसभेत अनेक झोपडपट्टी आहेत. भोसरी व चिंचवड विधानसभेच्या तुलनेत मतदारसंघात छोट्या छोट्या घरांमध्ये लोक राहतात. अशा सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना उच्च दर्जाची घरे देण्यासाठी आम्ही मोठे प्रकल्प राबवणार आहे.