पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी उमेदवारांची प्रचार पद्धती चर्चेचा विषय बनली आहे. काही उमेदवार प्रचारासाठी पारंपारिक वाद्य व रिक्षांवर स्पीकर लावून प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे क्रेनवरून मोठमोठे हार घालून, जेसीबीद्वारे फुलांची उधळण करत असलेले दृश्ये नव्याने सुरू झाल्याने लक्ष वेधून घेत आहेत.
परंतु, यातील सर्वाधिक चर्चेत असलेली पद्धत आहे क्रेनवरून हार घालणे. भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघात दिवसाला एकच क्रेन त्यावरती एकच मोठा हार घालून विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी सहभागासाठी वापरली जाते. यामुळे उमेदवारांच्या प्रचारात फक्त ‘देखावा’ करण्याची पद्धत समोर येत आहे. असे दृश्य लोकांना आश्चर्यचकित करत आहेत, कारण याला कोणताही ठोस प्रभाव नाही, परंतु प्रचाराच्या या पद्धतीला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे फक्त वरवर दिसत आहे.
त्याऐवजी, लोकांमध्ये ही प्रचार पद्धत त्यांना ‘धूळफेक’ करण्याचीच एक रणनीती वाटू लागली आहे. उमेदवार अधिकाधिक आकर्षक दृश्ये निर्माण करून, मतदारांचे लक्ष इतर मुद्दयांवरून वळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे. परिणामतः, लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून निवडणुकीतील सुरक्षेचे आणि विकासाचे खरे मुद्दे न विसरता, उमेदवारांची ‘फिल्मी’ पद्धत चांगलीच चर्चेत आली आहे.
या पार्श्वभूमीवर, काही लोकांच्या मते, हा प्रचाराच्या प्रचलित पद्धतीचा ‘बोलबाला’ निर्माण करून उमेदवारांचे खरे उद्दिष्ट काय आहे, हे समजून उमेदवारांची पोकळी उघड होत आहे. लोकांचा विश्वास गाठण्यासाठी फक्त देखावे न करता, वास्तविक कामगिरी आणि लोकाभिमुख धोरणे हवीत, घरोघरी भेटून माता भगिनींचे आशीर्वाद घ्यावेत समस्या जाणून घ्यावेत आणि त्यावरती उपाय योजना करावी अशी अपेक्षा मतदार व्यक्त करताना दिसत आहेत.




