भोसरी : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्याने वातावरण गढूळ झाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन प्रमुख राजकीय धुरंधरांमध्ये अतिशय तीव्र वाद सुरू असून, दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांना मतदान मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत.
सूत्रांच्या माहितीनुसार, भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रति मताला एक हजार ते ५ हजार रुपयांचा दिवसा ढवळ्या पैसा वाटण्याची बातमी ऐकिवात आली आहे. या पैशांच्या वाटपामुळे मतदारसंघात विधानसभा निवडणूक म्हणजे पैशाचा धुरळा आहे का विकासाची अशी लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.
तसेच प्रतिस्पर्धी उमदवाराचे चारित्र्य गढूळ करण्यासाठी सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या व्हिडिओंचा सिलसिला सुरु झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही एकमेकांवर अनियमितता, भ्रष्टाचार आणि अन्य गंभीर आरोप करत भाषणातून तर केलेच मात्र सोशल मीडिया वरतीही सुरू आहेत.
याशिवाय, आज आघाडीच्या वृत्तपत्र माध्यमांतून महायुती मधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् पवार या राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जाहिरातबाजी केली आहे, ज्यामुळे निवडणूक प्रचाराची शालीनता पूर्णपणे हरवली आहे.
निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची खालच्या पातळीवरील लढाई आणि असहमती राज्यासह भोसरीच्या मतदारसंघात एक नवीन पॅटर्न निर्माण करत आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असमाधान आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. हे सगळे परिस्थिती भोसरी विधानसभेतील निवडणूक अत्यंत उग्र व वादग्रस्त बनवण्याचे संकेत देत आहेत. मतदारसंघातील मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत कसे जाईल, यावर अनेकांचे लक्ष लागले आहे.