बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा तब्बल एक लाख ८९९ मतांनी पराभव करून एकतर्फी विजय मिळविला. या निकालाने भावनिकतेपेक्षा बारामतीकरांनी विकासाला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. अजित पवार हे सलग आठव्यांदा निवडून आले.
पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार असल्याने बारामतीतील निवडणूक ही लक्षवेधी ठरली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अजित पवार यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. ही आघाडी त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत विजय साकारला. अजित पवार यांना १ लाख ८१ हजार १३२ मते, तर युगेंद्र पवार यांना ८० हजार २३३ मते मिळाली. तब्बल एक लाख ८९९ मतांनी अजित पवार हे विजयी झाले. गेल्या निवडणुकीत त्यांना एक लाख ६५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता होती. बारामती विधानसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांना ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, युगेंद्र पवार यांना बारामतीकरांनी नाकारले. या मतदार संघात २३ उमेदवार होते.




