पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सुरक्षा वाढवण्यासाठी सुमारे ७ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले असून, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, सद्यस्थितीत एकूण कॅमेरे आहेत त्यापैकी 10 टक्के कॅमेरे सुरू असल्याचे एक धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे.
शहरात एखादी घटना किंवा गुन्हा घडतो अशावेळी गुन्हेगार शोधण्यासाठी या कॅमेऱ्यांचा वापर करावा लागतो. पण हकीकत अशी आहे की शहरातील केवळ 10 टक्के म्हणजेच 700 कॅमेरेच कार्यरत असल्याची धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. बाकीचे 90 टक्के कॅमेरे निष्क्रिय आहेत, ज्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांचा मागोवा घेणे आणि तपास करणे कठीण झाले आहे.
या समस्येमुळे, सुरक्षेच्या दाव्यांना खोडा घातला जात आहे. याबाबत पोलीस उघडपणे बोलू शकत नाही. कारण पोलिसांच्या हातावर घडी व तोंडावर बोट ठेवावे लागते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर त्वरित उपाययोजना घेणे आणि सर्व कॅमेरे कार्यरत करणे आवश्यक आहे, अन्यथा पिंपरी चिंचवड शहराची सुरक्षा यंत्रणा धोक्यात येईल.




