वडगाव मावळ : निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ बार चालू ठेवून ग्राहकांना दारु विक्री करता वाद्य, ऑर्केस्ट्रा चालू ठेवल्याने सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी धाड घालून दोन ऑर्केस्ट्रा बारचालकावर गुन्हे दाखल केले. कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट आणि वडगाव मावळ येथील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट या दोन बार चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने शुक्रवारी रात्रीपासून परिसरातील हॉटेल, बार तसेच ऑर्केस्ट्रा बारची अचानक तपासणी केली. त्यात कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंटमध्ये विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी ग्राहकांना खाद्य पदार्थ, दारु इत्यांची विक्री केली जात होती. तसेच वाद्य, ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला आढळून आला. वडगाव येथील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंटमध्येही अशाच प्रकारे विहित वेळेपेक्षा अधिक काळ दारु विक्री आणि ऑर्केस्ट्रा सुरु होता. दोन्ही बारवर कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने केली आहे.




