
पिंपरी : चाकण-शिक्रापूर मार्गावर एका कंटेनरने पोलिसांच्या मोटारीसह दहा वाहनांना धडक दिली. यात दोन महिला, अकरा वर्षांच्या मुलीसह वाहतूक मदतनीस (वॉर्डन) जखमी झाला. दोन पोलिसांनी प्रसंगावधान राखत मोटारीतून उडी मारल्याने ते बचावले. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. कंटेनरचालकाचा २१ किलोमीटरपर्यंत पाठलाग सुरू होता.
ज्योती प्रवीण ढोले (वय ३६, रा. बालाजीनगर, चाकण), पोर्णिमा अंबादास गाढवे (वय २७), धनश्री अंबादास गाढवे (वय ११, रा. भोसरी) आणि वॉर्डन अभिजीत कदम (वय ३७) अशी जखमींची नावे आहेत. कंटेनरचालक अकिब अब्दुल रज्जाक खान (वय २५, रा. पलवल, हरियाणा) हा नागरिकांच्या मारहाणीत जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हा चाकण येथून शिक्रापूरकडे निघाला होता. तळेगाव चौकात भरधाव कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवरून ज्योती, पोर्णिमा आणि धनश्री या तिघी चालल्या होत्या. कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघीही रस्त्यावर पडल्या. धनश्रीच्या पायावरून कंटेनरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर थांबण्याऐवजी कंटेनरचालक खान हा कंटेनरसह शिक्रापूरच्या दिशेने सुसाट निघाला. रस्त्यात येणाऱ्या वाहनांना धडक देत तो निघाला. कंटेनरने पुढे जात असताना सुरुवातीला एका मोटारीला धडक दिली. यात मोटारीचे नुकसान झाले. तरीही न थांबता खान याने कंटेनर तसाच पुढे नेला. याबाबत माहिती मिळताच चाकण पोलिसांनी मोटारीतून कंटेनरचा पाठलाग सुरू केला.
चाकणपासून पिंपळे- जगताप हद्दीपर्यंत दहा वाहनांना कंटेनरने धडक दिली. चौफुला परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका टेम्पोला पाठीमागून धडक दिली. तर अन्य एका मोटारीला ठोकरले. बहुतांश ठिकाणी हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या मोटारीने बहूळ येथे कंटेनरला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या मोटारीलाही ठोकर देऊन चालकाने कंटेनर तसाच पुढे दामटला. यात वॉर्डन जखमी झाला. सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे व सहायक फौजदार रोहिदास मोरमारे यांनी प्रसंगावधान राखत मोटारीमधून उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला.
दरम्यान, चाकण पोलिसांनी पुढील गावातील ग्रामस्थांना कंटेनर थांबविण्यासाठी रस्त्यात डंपर आडवा लावण्याच्या सूचना केल्या. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाजेवाडी येथे चाकण पोलीस व शिक्रापूर पोलीस यांच्या मदतीने स्थानिक लोकांनी रस्त्यात डंपर आडवा लावला आणि कंटेनर थांबविण्यात यश आले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी चालक खान याला चांगलाच चोप दिला. त्यात खान जखमी झाला. त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
कंटेनर प्रथम एका दुचाकीला धडकला आणि नंतर पळून जाताना इतर वाहनांना धडकला. दहा वाहनांना धडक दिली आहे. आणखी काही नुकसान झाले आहे का, याचा तपास सुरू आहे. चाकण पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. तो मद्याधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का, हे तपासण्यासाठी त्याची वैद्याकीय चाचणी केली जाणार आहे.
डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त
२१ किलोमीटर अंतरापर्यंत थरार
रस्त्यात वाहनांना धडक देत निघालेल्या कंटेनरने शेळपिंपळगाव जवळ वळसा घेऊन पुन्हा चाकणच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र, समोरून येणारी असंख्य वाहने पाहून चालक खान याने कंटेनर पुन्हा वळवून शिक्रापूरच्या दिशेने गेला. स्थानिक नागरिकांनी व रस्त्यावरील अनेकांनी कंटेनर थांबविण्यासाठी दगडफेक केली. मात्र, कंटेनर न थांबता पुढे जातच होता. अखेर वाजेवाडी येथे डंपर आडवा लावून अथक प्रयत्नानंतर कंटेनरला रस्त्याच्या खाली ढकलले. त्याचवेळी कंटेनर बंद पडल्याने थांबला आणि तब्बल २१ किलोमीटर अंतर सुरू असलेला थरार थांबला.




