पिंपरी : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास, तर कधी ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन लूटमार करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवडमधील २० हजार ६८८ जणांनी राष्ट्रीय सायबर संकेतस्थळावर तक्रारी केल्या आहेत. ४२९ कोटी रुपये सायबर चोरट्यांनी लांबविले आहेत. सायबर चोरट्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच तीन हजार ५६६ जण हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञाननगरीत काम करणारे आहेत. त्यामुळे उच्च शिक्षितच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांना ऑनलाइन गंडा घालण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गृहिणींपासून अभियंत्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षित नागरिकसुद्धा सायबर गुन्हेगारांचे बळी ठरत आहेत. मागील काही वर्षांपासून ह्यरस्त्यावरील गुन्हेगारीच्या तुलनेत सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर अंकुश ठेवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. यातील विशेष म्हणजे उच्च शिक्षितांनादेखील सायबर गुन्हेगार लक्ष्य करू लागले आहेत. वर्षभराचा आढावा घेतला असता उच्च शिक्षित तरुणांना सायबर चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात गंडा घातल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या सर्वाधिक तक्रारी माहिती व तंत्रज्ञाननगरी असलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. मागील वर्षभरात ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या हिंजवडीत तीन हजार ५६६ तक्रारी आहेत. त्या खालोखाल वाकड पोलीस ठाण्यात तीन हजार २१५ तक्रारी आहेत. हिंजवडी परिसरात अभियंत्यांची संख्या मोठी आहे. अभियंत्यांना ऑनलाइन तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती असते; मात्र तरीदेखील हिंजवडी पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये आयटीयन्सची संख्या मोठी आहे.
सायबर चोरट्यांकडून तीन कोटी वसूल
पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याने मागील वर्षभरात सायबर चोरट्यांकडून तीन कोटी ६७ लाख रुपये परत मिळविले आहेत. यामुळे फसवणूक झालेल्या तक्रारदारांना दिलासा मिळाला आहे. २०२३ मध्ये केवळ ४० लाख रुपये वसूल केले होते.
कंबोडियातून सायबर फसवणूक
कंबोडिया देशातून भारतात सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. फसवणुकीसाठी कंबोडियातील मुख्य आरोपीला बँक खाते पुरविणाऱ्या सहा जणांना सायबर पोलिसांनी जेरबंद केले.
कशी होते फसवणूक?
सायबर चोरटे समाजमाध्यमावरून गुंतवणूक, जास्त परतावा देण्याच्या जाहिराती प्रसारित करतात. व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केला जातो. त्यामध्ये नवनवीन लोकांना सहभागी करून घेतले जाते. सायबर चोरट्यांचेच आठ ते दहा साथीदार ग्रुपचे प्रमुख (अॅडमिन) असतात. त्यांच्याकडून सातत्याने ग्रुपमध्ये बनावट माहिती टाकली जाते. आज मला खूप नफा झाला, अशा आशयाचा मजकूर सातत्याने ग्रुपमध्ये नमूद केला जातो. त्यामुळे ग्रुपमधील नवीन सदस्यांना देखील गुंतवणुकीसाठी आमिष दाखविले जाते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखविली जातात.
म्युल खाते म्हणजे काय?
सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम वर्ग, प्राप्त करण्यासाठी सायबर चोरटे जे बँक खाते वापरतात, त्याला म्युल खाते म्हणतात. हे खाते इतरांच्या वतीने बेकायदा पैसे मिळवण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते. ही खाती सर्वसामान्य व्यक्तींची असतात. त्यामध्ये कामगारांचा समावेश असतो. या नागरिकांकडून कागदपत्रे घेतली जातात. त्यांच्या नावे खाते काढले जाते. त्याबदल्यात खातेदारकाला काही रक्कम दिली जाते. परंतु, ही खाती सायबर चोरटे हाताळतात.




