पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघात 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना 31 जानेवारी रोजी होणार आहे. या T20 सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या सामन्याचे तिकीटं देखील पूर्णपणे विकली गेली आहे. मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं राज्य शासनानं तसंच आरोग्य विभागानं ज्या सूचना केल्या आहे, त्या सूचनांनुसार स्टेडियम मध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मोफत स्वच्छ पाणी देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी संतोष बोबडे यांनी दिली आहे.
प्रेक्षकांना मोफत पाणी : शहरात वाढत असलेल्या गुलेन बारी सिंड्रोम जीबीएस या आजाराबाबत संतोष बोबडे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “शहरात या आजरचे रुग्ण वाढत आहेत आणि या अनुषंगानं राज्य शासनानं आम्हाला काही सूचना केल्या आहे आणि त्या सूचनांचं पालन होणार आहे. मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना कुठलाही त्रास होणार नाही याची देखील खबरदारी आमच्याकडुन घेण्यात आली आहे. आपल्या मैदानावर पाणी हे 3 स्टेप मधून येत असतं आणि पाण्याचं शुध्दीकरण हे केलं जातं आणि मगच येणाऱ्या प्रेक्षकांना मोफत पाणी हे दिलं जाणार आहे.”
मोफत पिण्याचं पाणी उपलब्ध : मागील भारत विरुद्ध न्यूझीलंड टैस्ट सामन्यात पाण्याच्या पुरवठ्यात आलेल्या तांत्रिक अडचणींवर उपाय करण्यात आले असून, स्टेडियममध्ये मुबलक पिण्यायोग्य पाणी नियमित उपलब्ध राहील.या सामन्याची वेळ संध्याकाळची असल्याने, उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता नाही. तथापि, प्रेक्षकांसाठी पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध असेल अस देखील यावेळी बोबडे यांनी म्हटलं आहे.




