नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी मतदान झाले. ‘आप’ व भाजपमध्ये दिवसभर आरोप-प्रत्यारोप होत राहिल्यामुळे लढतीतील चुरस अधोरेखित झाली. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजामध्येही त्याचे प्रतिबिंब उमटले. १० पैकी ८ चाचण्यांनी भाजप विजयी होण्याची शक्यता वर्तवली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५९.७१ टक्के मतदान झाले असून यात वाढहोण्याची शक्यता आहे. २०२० साली ६२.५९ टक्के मतदान झाले होते.
तीन मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला दोनतृतीयांशपेक्षाही जास्त (५० ते ६०) जागा मिळू शकतील असे भाकीत केले. दोन चाचण्यांचा अपवाद वगळता इतर अंदाजांनी भाजप बहुमताचा ३६चा आकडा सहज पार करेल असे सुचित केले. ८ चाचण्यांनी भाजपला ३५ ते ४९ जागा मिळू शकतील असे मानले असून ‘पीपल्स पल्स’ या संस्थेच्या अंदाजानुसार भाजपला प्रचंड बहुमत मिळताना दिसते. केंद्रातील सत्ताधारी पक्षाला ७० जागांपैकी तब्बल ५१ ते ६० जागा मिळण्याची शक्यता यात वर्तविण्यात आली आहे. सलग तीन वेळा दिल्ली जिंकणाऱ्या ‘आप’ला १८ ते ३२ जागा मिळू शकतात असा या विविध चाचण्यांचा कयास आहे. ‘माइंड ब्रिंक’ या संस्थेच्या अंदाजानुसार मात्र ‘आप’ चौथ्यांदा सत्ता राखू शकेल, असे भाकीत केले. त्यांच्या अदाजानुसार ‘आप’ला ४४-४९ तर भाजपला २१-२५ जागा मिळू शकतील. मात्र ‘आप’च्या १३-१७ जागा कमी होत असल्याचे दिसते.
‘वीप्रिसाइड’ या संस्थेने ‘आप’ला ४६-५२ जागा दिल्या आहेत. बाकीच्या अंदाजांमध्ये ‘आप’च्या जागांमध्ये प्रचंड घसरण होणार असल्याचे दर्शवले आहे. मगच्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला अनुक्रमे ६७, ६२ जागा व ५४ टक्के मते मिळाली होती. हे अंदाज खरे ठरले तर ‘आप’च्या जागांबरोबर मतांच्या टक्केवारीतही मोठी घसरण दिसू शकेल. दिल्लीतील तिरंगी लढतीत काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा अपयश येण्याची शक्यता असून मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार काँग्रेसला कदाचित एकही जागा मिळणार नाही. काँग्रेसने खाते उघडलेच तर जास्तीत जास्त ३ जागांवर समाधान मानावे लागेल.
शनिवारी मतमोजणी
निवडणुकीची मतमोजणी शनिवारी, ८ फेब्रुवारी रोजी होणार असून भाजपने दिल्ली जिंकली तर हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्ली हे पक्षाला मिळालेले सलग तिसरे मोठे यश असेल. मतदानाच्या चार दिवस आधी, १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची केंद्र सरकारची अर्थसंकल्पातील घोषणा भाजपसाठी विजयी एक्का ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हाती फारसे काही लागणार नसले तरी, मतांचा टक्का वाढला तर त्याचा लाभही भाजपला झाला असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे मतदान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकुटुंब मतदान केले. केंद्रीयमंत्री एस. जयशंकर, हरदीप पुरी यांच्यासह काँग्रेसचे नेते सोनिया, राहुल व प्रियंका गांधी-वढेरा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
दिल्लीत तुलनेने शांततेत मतदान पार पडले असले तरी ‘आप’ व भाजपमध्ये दिवसभर आरोप-प्रत्यारोप होत राहिले. सीलमपूर या मुस्लीमबहुल मतदारसंघामध्ये बुरखे खालून बनावट मतदारांनी मतदान केल्याच्या आरोपामुळे गोंधळ निर्माण झाला होता. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जंगपुरा मतदारसंघातही आप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्षामुळे निर्माण झाला होता. ग्रेटर कैलाश मतदारसंघातील आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी, मतदारांची अडवणूक केली जात असल्याचा पोलिसांवर आरोप केला. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मतदान होत असताना पैसे वाटल्याचा दावा काँग्रेसने केला.
संस्था आप भाजप काँग्रेस
मॅट्राईज ३२३७ ३५४० ०१
जेव्हीसी पोल २२३१ ३९४५ ०२
पीपल्स पल्स १०१९ ५१६० ०
पीपल्स २५२९ ४०४४ ०१ इनसाइट
पीमार्ग २१३१ ३९४९ ०१
माइंड ब्रिंक ४४४९ २१२५ ०१
वीप्रिसाइड ४६५२ १८२३ ०२




