पुणे (मावळ) : सध्या जगभरात ‘व्हॅलेंटाईन विक’ सुरू असून दररोज विविध डे साजरा केले जात आहेत. तसेच येत्या १४ तारखेला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचं फूल एकमेकांना दिलं जातं. अशा या व्हॅलेंटाइन डे निमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ येथील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झालीय. यंदाच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला मावळमधून जवळपास 25 ते 30 लाख गुलाबांची निर्यात होणार असल्याची माहिती फुल उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांनी दिली.
फुल उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू : मावळमध्ये गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. व्हॅलेंटाइन डे अर्थात 14 फेब्रुवारीला प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाचं फुल दिलं जातं. या गुलाबाच्या फुलांना देश-विदेशातून मोठी मागणी आहे. या निमित्तानं मावळमध्ये एक महिन्यापासूनच फुल उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या गुलाबांच्या निर्यातीला 26 जानेवारीला सुरुवात झाली असून रोज विविध देशात मावळमधील गुलाबाची फुले पाठवली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

या देशात पाठविली जातात गुलाबाची फुलं : “मावळच्या गुलाबांना यावर्षी भारतात देखील चांगला भाव मिळाला आहे. पण एक्स्पोर्टमध्ये निसर्गातील या बदलामुळं आम्हाला काम करता आलं नाही. यावर्षी ऑस्ट्रेलिया, दुबई, मलेशिया, जपान, न्यूझीलंड येथे गुलाब पाठवत आहोत. तसेच गेल्या दहा वर्षात दरात काहीही फरक झालेला नाही, पण ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला आहे. ही फुल वेगवेगळ्या देशात जात आहेत. सरकारनं ट्रान्सपोर्टसाठी काहीतरी केलं पाहिजे. तसेच यावर्षी एका फुलाला १४ ते १६ रुपये दर मिळाला आहे”, असं फुल उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांनी सांगितलं.

दररोज ७० ते ८० हजार फुलांची विक्री : “फुल उत्पादन क्षेत्रात काम करत असताना आम्ही बॉक्स पॅकिंगसाठी दररोज थेट ऑर्डर घेत असतो. ते ही ऑनलाईन घेत असतो. ऑनलाईन ऑर्डर घेतल्यावर प्रत्येकाच्या मागणीनुसार गुलाब पाठवतो. दररोज ७० ते ८० हजार फुलांची विक्री करतो. तर सध्या वेगवेगळया देशात मावळमधील गुलाब आपण पाठवत आहोत,” असं तान्हाजी शेंडगे म्हणाले.

शेतकऱ्यानं सुरू केली कंपनी : ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमाचं प्रतीक म्हणून दिल्या जाणाऱ्या गुलाबामुळं मावळातील शेतकरी देखील मालामाल झाला आहे. तान्हाजी शेंडगे या शेतकऱ्यानी ‘साई रोज कंपनी’ स्थापन केलीय. या गुलाब शेतीतून शेतकरी कोटींची उलाढाल करून परकीय चलन भारतात आणण्याचा पराक्रम करत आहे.




