
पिंपरी- राज्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेता सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन शासनाकडून केले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने सौरऊर्जेचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका भवनासह विविध प्रशासकीय इमारती, शाळा, नाट्यगृहे, रुग्णालय इमारतींवर सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवून तो कार्यान्वित केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेले आहेत. शाश्वत ऊर्जेतून विजेची बचत करण्याच्या हेतूने महापालिकेच्या विविध शाळा, प्रशासकीय इमारती, नाट्यगृहे, रुग्णालय इमारतींवर पूर्वी ६३१ किलोवॅट क्षमतेचे सोलर रुफ टॉप प्रकल्प बसवून कार्यान्वित करण्यात आले आहेत. पालिकेत एसी, पंखे, लाइट, लिफ्ट, पाण्याचा कूलर, संगणक, झेरॉक्स मशिन यांसारख्या उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या उपकरणांकरिता ९९० किलोवॉट क्षमतेची आवश्यकता असते. महापालिका भवनातील वीज बिलापोटी दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च येतो.
याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरचा वापर केला जातो. वीजबचत कशी होईल व महापालिकेच्या पैशांची कशी बचत होईल, याकरिता विद्युत विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. याचाच एक भाग म्हणून एलईडी दिव्यांचा वापर महापालिकेने सुरू केला आहे. याशिवाय कार्यालयात कुणी नसताना दिवे आपोआप बंद होऊन विजेची बचत व्हावी, यासाठी काही कार्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सेन्सर लावण्यात आले असून, हा प्रयोग यशस्वीही झाला आहे. महापालिका भवनावर ५० किलोवॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ४८ लाख रुपयांचा खर्च केला आहे. सुरुवातीची तीन वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणारी कंपनी केली आहे. उर्वरित आणखी चार वर्षे देखभाल दुरुस्तीचे काम प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला चार लाख रुपये वार्षिक खर्च महापालिकेने दिले आहे.
पाच वर्षांत वीज बिलापोटी जेवढी रक्कम महापालिकेला द्यावी लागली आहे, ती सौरऊर्जा प्रकल्पातून वसूल होण्यास मदत झाली आहे. महापालिकेच्या वीज बिलाची बचत झाली आहे. महापालिकेने यापूर्वी इ क्षेत्रीय कार्यालयात साडेनऊ लाख रुपये खर्चून १० किलोवॉटचा प्रकल्प उभारला आहे. महापालिका भवनात देखील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. महापालिकेच्या इतर इमारतींमध्येही सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत आहे. आता नव्याने ८ प्रभाग मिळून एकूण ८४ ठिकाणी ३०९७ किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. यामुळे प्रतिवर्ष महावितरण कंपनीच्या प्रचलित युनिट दरानुसार महापालिकेची सुमारे ४.८३ कोटी इतकी बचत होणार आहे.
आतापर्यंत निगडी प्राधिकरण येथील अ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड येथील तारांगण, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, मोहननगर येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन, संभाजीनगर येथील शाहू महाराज जलतरण तलाव, वाय.सी.एम रुग्णालय, महापालिका मुख्य प्रशासकीय भवन, जलशुद्धीकरण केंद्र, मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हेडगेवार भवन येथेही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
येत्या काही दिवसांत महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवरही सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच झाले. ८४ ठिकाणी ३०९७ किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. त्यामुळे महापालिकेची सुमारे ४.८३ कोटी इतकी बचत होण्यास मदत होईल.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका




