
पिंपरी : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्कमध्ये विप्रो सर्कलजवळ घडली. बसचा मागील दरवाजा न उघडल्याने चौघांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एका महिलेसह चार कामगारांनी प्रसंगावधान राखत बसमधून उडी मारल्याने ते बचावले.
शंकर कोंडीबा शिंदे (वय ६३, रा. नऱ्हे आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (वय ४०, रा. हनुमाननगर, पौड फाटा), सुभाष सुरेश भोसले (वय ४५, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) अशी मृत्युमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत. तर, बसचालक जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रवीण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे पाच कामगार जखमी असून त्यांच्यावर हिंजवडीतील रूबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोन जण ४० टक्क्यांहून अधिक भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
विश्वास गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप राऊत यांनी प्रसंगावधान राखत बसच्या दरवाजातून उडी मारल्याने ते बचावले. हिंजवडी माहिती व तंत्रज्ञाननगरीतील टप्पा दोनमध्ये ‘व्योम ग्राफिक्स या नावाने प्रिटींग प्रेस कंपनी आहे. कंपनीचे काम सकाळ आणि दुपार अशा दोन पाळीत चालते. कंपनीतर्फे कामगारांची ने-आण करण्यासाठी बसची सुविधा आहे. बसचालक हंबर्डीकर हे दररोज सकाळी साडेसहा वाजता वारजे माळवाडी येथून कामगारांना बसमध्ये घेतात आणि पावणेआठला बस कंपनीत पोहोचते. बुधवारी सकाळी हंबर्डीकर यांनी नेहमीप्रमाणे वारजे येथून १२ कामगारांना घेतले. चांदणी चौकात साडेसात वाजता एका कामगाराला घेतले. कामगारांना घेऊन बस हिंजवडी येथे विप्रो सर्कल चौकाजवळ आली असता अचानक बसच्या पुढील भागातून धूर येऊ लागला. काही कळायच्या आत आग लागली.
चालकाच्या पायाला भाजल्याने त्याने त्वरित उडी मारली. बस रस्तादुभाजकाला जाऊन धडकून थांबली. काही क्षणात आगीने बसला वेढा घातला. बसमध्ये पुढील आसनावर बसलेल्या मंजिरी या महिलेसह चार जणांनी प्रसंगावधान राखत बसमधून खाली उडी मारली. त्यांच्या मागे असलेल्या पाच जणांना आगीची झळ बसली. त्यांनी पेटत्या अवस्थेत बसमधून खाली उडी मारली. यात दोन कामगार गंभीर भाजले. मात्र, पाठीमागील आसनावर बसलेल्या उर्वरित चार कामगारांना बसमधून खाली उतरायची संधी न मिळाल्याने ते बसमध्ये अडकले. त्यानी बसचा पाठीमागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला नाही. गुदमरून आणि होरपळून चारही कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. जवानांनी पाण्याचा फवारा मारून काही वेळात आग विझवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसचा पाठीमागील दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले.
