हिंजवडी : पत्रकार असलेल्या प्रशांत कोरटकरकडे सात ते आठ कोटी रुपयांची आलिशान गाडी आली तरी कुठून? याची खरी माहिती समोर आली आहे.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधानं करणारा नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकरसंदर्भात नवनवीन खुलासे रोज समोर येत आहेत. प्रशांत कोरकटरकडे असलेल्या महागड्या रोल्स रॉयसच गूढ अखेर उकललं आहे. प्रशांत कोरटकर जी आलिशान रोल्स रॉयस चालवताना दिसतो ती पिंपरी – चिंचवडमधील बांधकाम व्यवसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलं आहे.
त्या रोल्स रॉयसचा मालक कोण?
तुषार कलाटे यांच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये कोरटकर चालवत असलेली आलिशान रोल्स रॉयस उभी असल्याचं हाती लागलेल्या व्हिडीओजमधून दिसून येतं आहे. डबल्यूबी – 02 – एबी 123 या क्रमांकांच्या या रोल्स रॉयससोबत तुषार कलाटेचे फोटो देखील समोर आले आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडीओ ही आहे. या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येत आहे. मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत.
4700 कोटींच्या घोटाळ्याशी कनेक्शन…
तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉयस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का हा प्रश्न निर्माण होत आहे. ही रोल्स रॉयस 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रोल्स रॉयसबाबत देखील त्याच्याकडे चौकशी करण्यात आली होती . मात्र त्याने या कारबाबत माहिती देण्यास नकार दिला.




