- प्रभाग क्र. २८ रहाटणी-पिंपळे सौदागारमध्ये दवाखाना व तालिम जीर्ण; नवीन सुविधांसाठी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – प्रभाग क्र. २८ अंतर्गत येणाऱ्या रहाटणी-पिंपळे सौदागार परिसरातील नागरीकांसाठी महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला दवाखाना सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, त्याची जागा अपुरी पडत आहे. नागरिकांना बसण्यासाठी केवळ तात्पुरत्या स्वरूपातील पत्रा शेडची सुविधा उपलब्ध आहे. लहान मुलांचे लसीकरणही याच दवाखान्यात होत असल्याने गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण होते.
या दवाखान्याबरोबरच परिसरातील कुस्ती, कबड्डी आणि इतर खेळातील स्थानिक खेळाडूंना व्यायामाची सुविधा देण्यासाठी महापालिकेने तालिम व जिमची उभारणी केली होती. मात्र ही तालीम देखील कालांतराने जुनी व जीर्ण झाल्याने, वारंवार दुरुस्ती व डागडुजी करावी लागत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे या दोन्ही वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन, आत्याधुनिक आणि सुविधासंपन्न दवाखाना तसेच तालीम उभारण्याची मागणी केली आहे.
नाना काटे यांनी स्पष्ट केले की, रहाटणी-पिंपळे सौदागारसारख्या वाढत्या लोकसंख्येच्या परिसरात नागरिकांच्या आरोग्य आणि खेळकूद गरजांकडे दुर्लक्ष होणे योग्य नाही. त्यामुळे या भागाला दर्जेदार सार्वजनिक सुविधा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे.