चिखली : घरकुल परिसरातील मोरया धाम सोसायटीत काल रात्री एक दुर्दैवी घटना घडली. रात्री अंदाजे 9:00 ते 9:30 च्या दरम्यान इमारत डी-34 मधील घर क्र. 604 येथे राहणाऱ्या रफिक कुरेशी दाम्पत्याच्या घरामध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील साहित्य, वस्तू, कागदपत्रे सर्व काही भस्मसात झाले. ही दुर्घटना इतकी भयावह होती की कुरेशी कुटुंबियांनी आपल्या डोळ्यांसमोर आपले सर्वस्व गमावले.
या घटनेने कुरेशी दाम्पत्यावर मानसिक आघात झाला आहे. त्यांच्यावर आलेली आपत्ती घरकुलमधील सामाजिक कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी ठरली. ‘घरकुल’ या कुटुंबाचा एक भाग अडचणीत असताना, संपूर्ण कुटुंब त्याच्या मदतीला धावून जाणे ही भावना लक्षात घेऊन लगेचच एक हात मदतीचा पुढे करण्यात आला.
या दुर्घटनेनंतर काही तासांतच आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्त्या सौ. कीर्तीताई मारुती जाधव (युथ फाउंडेशन) यांच्या पुढाकाराने कुरेशी कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे त्यांच्या संकटात काहीसा दिलासा मिळाला.
या मदत उपक्रमासाठी घरकुलमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये मारुती जाधव, शांताराम खुडे, राजाभाऊ जाधव, दशरथ शिंदे, कुणाल पळसकर, दत्ता धर्मे, अक्षय ओहोळ, संतोष माळी, सुदाम जाधव, तेजस कडलक, पोपट आरणे, धर्मे काकू यांचा समावेश होता. तसेच कुरेशी कुटुंबीयही या वेळी उपस्थित होते.
ही मदत केवळ आर्थिक नसून एका कुटुंबाला आधार देणारी आहे. सामाजिक भान जपत समाजाने एकत्र येत दिलेला हा एक हात मदतीचा खरंच प्रेरणादायी आहे.




