पिंपरी : कुंडमळा येथे साकव पूल कोसळून झालेल्या अपघाताबद्दल सोशल मीडियावर नागरिक, नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे, हळहळ व्यक्त केली आहे. तर प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय,” अशी टीका केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे जिल्ह्यातील पूल दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गृहमंत्री अमित शाहांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पूल दुर्घटनेची माहिती घेतली आहे.
मावळातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुपारी तीनच्या सुमारास कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला. अजूनही आकडा निश्चित नाही. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. सोशल मीडियावरून घटनेची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात असून विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “पूल गिरने की घटना से दुखी हूं.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे जिल्ह्यातील पूल दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून घटनेविषयी चर्चा केली. अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट केली आहे – “पूल गिरने की घटना से दुखी हूं. पीड़ित परिवार के प्रति संवेदना. घायलों के जल्दी ठीक होने की कामना,” अशी संवेदना शहा यांनी व्यक्त केली आहे.




