पिंपरी : आशिया खंडांतील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवडचा उल्लेख होतो. गेल्या तीन चार वर्षात या शहराचा कायापालट झाला. वेळप्रसंगी कठोर भुमिका घेत समाजहिताच्या कामाला प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे शेखर सिंह हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आहेत. गेल्या तीन- चार वर्षात महापालिकेने विविध प्रयोग राबवत शहरवासीयांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. पिंपरी- चिंचवडमध्ये कामाचा धडाका लावणाऱ्या शेखर सिंह यांच्या कामाची राज्य, देश पातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेतली जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शेखर सिंह यांनी आपल्या कामांची चुणूक दाखवली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागात जल्लोष शिक्षणाचा, विद्यार्थी मुल्याकंन, शाळांमधील विविध कार्यक्रम अशा उपक्रमामार्फत महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवत सर्वसामान्य जनतेच्या मुलांना चांगले शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. त्याच प्रमाणे ५२ हजार विद्यार्थ्यांना ब्रँडेड शालेय साहित्य देत त्यांनी पालकांची वाहवा मिळवली.
आयुक्त शेखर सिंह यांनी आपल्या कार्यकाळात महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले. प्रोजेक्ट सक्षमा हा त्यांचा महत्वकांक्षी उपक्रम होता. याच्यामाध्यमातून स्वयं सहायता गटांची निर्मीती करत महिलांना विविध कौशल्य शिकवण्यात आलीत. या उपक्रमात १३० महिला क्लस्टर व सात महासंघांची नोंदणी झाली आहे. १० हजारापेक्षा जास्त महिलांना दशसुत्री संकल्पनांवर प्रशिक्षण देण्यात आले. ५८०० महिलांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शेखर सिंह यांच्या या उपक्रमांचे देशभरात कौतुक झाले. त्याचप्रमाणे हजारो महिलांना आर्थिक बळकटी देखील मिळाली आहे.
उद्योगाच्या मागणीप्रमाणे युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण, करिअर समुपदेशन करणारा ‘प्रोजेक्ट कौशल्य’ हा सिंह यांचा आणखी एक चर्चित उपक्रम. या योजनेचा अनेक होतकरू युवकांना लाभ झाला आहे. यामुळे ३८७० युवांना सरासरी १३ हजार रूपये मासिक उत्पन्न असलेल्या नोकऱ्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. महापालिकेच्या या उपक्रमाचे उद्योगजगताने देखील कौतुक केले. तब्बल ७ हजार युवांनी फाउंडेशन कोर्समध्ये नावनोंदणी केली आहे.
शेखर सिंह यांनी अशा विविध उपक्रम, योजनांच्या माध्यमातून महापालिकेचे काम जनताभिमुख करण्यावर भर दिला होता. त्यांच्या काळात एखादा अधिकारी किती वेगवेगळे प्रयोग करूनशकतो हे पिंपरीकरांना पहिल्यांदाच दिसून आले.
आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा मान
शेखर सिंह यांनी राबविलेल्या नवी दिशा सामुदायिक शौचालयाची जागतिक पातळींवर दखल घेण्यात आली. डिसेंबर २०२३ मध्ये पिंपरी चिंचवडला शहरी नवोपक्रमासाठी ग्वांगझोऊ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.