
पिंपरी: पायाभूत सुविधांचा अभाव, दस्तासाठी लागणारा वेळ, जुना दस्त मिळण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे आणि पक्षकरांना मिळणारी दुयय्म वागणूक अशी स्थिती पिंपरी चिंचवड शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाची आहे. हवेली अंतर्गत असलेल्या पाच कार्यालयांत या वर्षात जवळपास 16 कोटी 52 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मात्र, त्या बदल्यात सुविधा मिळत नसल्याची खंत नागिरकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांना बसायला जागा मिळेना
राज्यात आता कोणात्याही ठिकाणांचा दस्त कोठेही नोंदला जात असल्याने गर्दी वाढत आहे. मात्र, सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने या कार्यालयाच्या स्थितीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नाही. पार्किंगचा अभाव असल्याने वाहने लांब पार्क करावी लागतात. तर, काही ठिकाणी पाणी पिण्यास नसल्याने विकत पाणी आणावे लागते. अधिकारी व कर्मचारी योग्य वागणूक देत नाहीत. तर, तासनतास थांबावे लागत असल्याने बसण्यासाठीदेखील पुरेसी जागा मिळत नाही. ऑनलाईन सेवा असूनही कामे वेळेवर आणि गतीने होत नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली जात आहे.
या आहेत समस्या
- कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी माहिती देत नाहीत
- नोंदणीसाठी अगोदर कळवूनही प्रत्यक्ष नोंदणीसाठी वेळ लागतो
- वाहन पार्किंग नसल्याने नागरिकांना करावी लागणारी पायपीट
- वेळखाऊ आणि मनमर्जी कामामुळे नागरिक हैराण
- नोंदणी पोर्टलच्या तांत्रिक अडचणी
- अधिकारी वेळेवर उपस्थित नसणे
- माहिती देण्यास टाळाटाळ
कार्यालय नोेंदणी (चालू वर्षातील)
हवेली 5 चिंचवडगाव : 3 कोटी 93 लाख
हवेली 14 लांडेवाडी, भोसरी : 2 कोटी 92 लाख
हवेली 17 दापोडी : 2 कोटी 45 लाख
हवेली 18 पिंपरी कॉलनी : 4 कोटी 60 लाख
हवेली 26 पिंपरी : 2 कोटी 61 लाख




