पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व विद्रुप करणा-या नागरिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील ७ हजार २१४ व्यक्ती, काही व्यावसायिक आस्थापना मालकावर दंडात्मक कारवाई केली. वर्षभरात तब्बल १ कोटी ४८ लाख ७०० रुपये दंड वसूल केला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सहभागी झाली आहे. शहर स्वच्छतेबाबत इंदौर पॅटर्न राबविला जात आहे. त्यासाठी कचरा कुंडी मुक्त शहर संकल्पना राबविली आहे.
शहरातील १८ मीटर पुढील रस्त्यांची साफसफाई यंत्राद्वारे केली जात आहेत. घरोघरचा कचरा संकलनाचे काम ठेकेदारांमार्फत सुरू आहे. ओला, सुका, प्लॅस्टिक, घातक, बायोवेस्ट अशा पाच प्रकारे वर्गीकरण केलेला कचराच स्वीकारला जात आहे. नागरिकांच्या जनजागृतीसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. शिवाय कचरा स्थलांतरणासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केंद्र सुरू केले आहेत.
शहरातील बेशिस्त नागरिक रस्त्यावर कचरा फेकत आहेत. त्यांच्यावर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका व शौच करणे, राडारोडा, कचरा टाकणे, कचरा रस्त्यावर जाळणे, डास उत्पती ठिकाणांकडे दुर्लक्ष करणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, जाहिरातींची भित्तिपत्रके लावणे, बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकणे, बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करणे यासह विविध प्रकारे शहर विद्रूप करणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर महापालिकेकडून दंड वसूल करण्यातयेत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर शहरात अस्वच्छता व विद्रूप करणाऱ्या ७ हजार २१४ व्यक्ती आणि व्यावसायिक आस्थापना चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ कोटी ४८ लाख ८५ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 2022-23 मध्ये 1 कोटी 5 लाख 14 हजार 521, 2023-24 मध्ये 1 हजार 844 नागरिकांकडून 38 लाख 75 हजार 500 रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात सुधारणा की घसरण?
शहर स्वच्छता आणि जनजागृतीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात शहराने सहभाग घेतला आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा देशात 13 वा आणि राज्यात तिसरा क्रमांक आला होता. त्यामुळे यंदा यामध्ये सुधारणा की घसरण होणार १७ जुलैला जाहीर होणा-या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
शहर स्वच्छतेसाठी नागरिकांची साथ हवी
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत असताना नागरिकांची साथ महत्वाची आहे. मात्र, शहरातील विविध भागातील नागरिक नियम माेडण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. ओला आणि सुका कचरा एकत्र देणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, थुंकणे, उघड्यावर शाैचालयास जाणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्पीकरण करणे, व्यावसायिक आस्थापनामार्फत कचरापेटी न ठेवणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे, डासाेत्पत्ती स्थानाची निर्मिती करणे, रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे, जैव वैद्यकीय घनकचरा रस्त्यावर टाकणे, सार्वजनिक सभा, समारंभ सपल्यावर स्वच्छता न करणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणा-यांना महापालिकेच्या वतीने 300 रूपयांपासून 35 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे.
“नागरिकांनी उघड्यावर कचरा, राडारोडा टाकू नये. लघुशंका करू नये. घरोघरचा कचरा पाच प्रकारात वर्गीकरण करून गोळा होत आहे. ओला, सुका, घातक, प्लॅस्टिक व बायोमेडिकल अशाप्रकारे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून शहरात अस्वच्छता व विद्रूप करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. “
– सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, महानगरपालिका.




